भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. शुभमन गिलची भारताच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर टी-२० कर्णधार बदलण्याच्या चर्चाही तीव्र झाल्या आहेत.
अजित आगरकर यांनी महत्त्वपूर्ण विधान
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदातील बदलाबाबत आगरकर म्हणाले, “तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असणे कठीण आहे.” आगरकर पुढे म्हणाले की, तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असल्याने रणनीती आखणे कठीण होते.
हे ही वाचा
सूर्यकुमार यादव कर्णधारपद गमावेल का?
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, शुभमन गिलला या फॉरमॅटचे कर्णधारपद देण्यात आले. आता, गिलकडे भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वही देण्यात आले आहे. अजित आगरकरच्या विधानामुळे अशी अटकळ बांधली जात आहे की तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकाच कर्णधाराची नियुक्ती केली जाऊ शकते. शुभमन गिल कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून काम करत असल्याने, भविष्यात गिलला टी-२० कर्णधार म्हणूनही नियुक्त केले जाऊ शकते.
बीसीसीआयने अद्याप याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ चा टी-२० आशिया कपही जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या टी-२० कर्णधारात बदल होण्याची शक्यता नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची टी-२० संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.