Mumbai T20 League : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर आता मुंबईतील खेळाडू हे टी-20 मुंबई लीग या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या टी-२० मुंबई लीग २०२५, सीझन ३ च्या रोमांचक सामन्यात भारताच्या व्हाईट-बॉल स्टार्समध्ये लढत झाली. यात श्रेयस अय्यरच्या सोबो मुंबई फाल्कन्सने सूर्यकुमार यादवच्या ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई संघाचा चार विकेट्सने पराभव केला.
१४५ धावांचे माफक आव्हान…
दरम्यान, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या नाईट्स संघाला सीम हालचाली असलेल्या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागला आणि त्यांना ५ बाद १४५ धावा करता आल्या. सूर्यकुमारला कार्तिक मिश्राने १ धावेवर बाद केल्यानंतर, सलामीवीर सिद्धांत अधातरावने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने सूर्यश शेडगेसोबत ४६ धावांची भागीदारी केली आणि त्याला निखिल गिरीने बाद केले. सूर्यश (२१ चेंडूत ४९*) आणि मकरंद पाटील (१३*) यांनी अखेरच्या षटकात नाबाद ३३ धावांची भागीदारी केली.
श्रेयसच्या फाल्कन्सच्या सहज विजय…
दुसरीकडे, फाल्कन्सला प्रत्युत्तरात धक्के बसले आणि हितेश कदमने इशान मुलचंदानी आणि श्रेयांश राय यांना लागोपाठ चेंडूंवर बाद केले. पण अय्यर (१३) आणि अंगकृष रघुवंशी यांनी ५४ धावांची भागीदारी करून डाव सावरला आणि श्रेयश अय्यरला परिक्षित वलसंगकरने पायचीत केले. त्यानंतर विनायक भोईर (३३) आणि आकाश पारकर यांनी ५६ धावांची भागीदारी करून नियंत्रण मिळवले. भोईरने वेग वाढवताना विकेट टाकली. पारकर आणि कुश कारिया यांनी चार चेंडू शिल्लक असताना फाल्कन्सला विजय मिळवून दिला.





