T20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील फलंदाज टोनी डी जॉर्जी आणि डोनोवन फरेरा दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या आगामी T20I मालिकेत तसेच T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. ही माहिती क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) यांनी दिली आहे.
क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) च्या माहितीनुसार, टोनी डी जॉर्जी गेल्या महिन्यात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेदरम्यान जखमी झाले होते. पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) करूनही त्यांची प्रकृती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही. त्यामुळे ते वेस्ट इंडीजविरुद्धच्या T20I मालिकेत खेळू शकणार नाहीत आणि भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्येही त्यांचा सहभाग राहणार नाही.
डोनोवन फरेरा विश्वचषकाला मुकणार
दरम्यान, जोबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील SA20 लीग सामन्यादरम्यान डोनोवन फरेराला डाव्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तो संघाबाहेर पडला. या दोन्ही खेळाडूंच्या जागी रायन रिकेलटन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेलाही मुकणार आहे. तथापि, टी-२० विश्वचषकासाठी त्याची उपलब्धता फिटनेस चाचणीच्या निकालांवर अवलंबून असेल.
रुबिन हरमन संघात सामील
सीएसएने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रुबिन हरमनला संघात समाविष्ट केले आहे. आफ्रिकन संघ २३ जानेवारीपासून एकत्र येणार आहे. पहिला टी-२० सामना २७ जानेवारी रोजी पार्लमधील बोलँड पार्क येथे खेळला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना २९ जानेवारी रोजी सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क आणि ३१ जानेवारी रोजी जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स स्टेडियमवर अनुक्रमे खेळला जाईल. एसए२० च्या बाद फेरीत खेळणारे खेळाडू २६ जानेवारी रोजी संघात सामील होतील. त्यानंतर संघ टी-२० विश्वचषकासाठी १ फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग विमानतळावरून भारताला रवाना होईल.
T20 वर्ल्ड कप 2026 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को यान्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एंगिडी, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रयान रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.
वेस्ट इंडीजविरुद्ध T20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
एडन मारक्रम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, रुबिन हरमन, मार्को यान्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, लुंगी एंगिडी, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रयान रिकेल्टन, जेसन स्मिथ आणि ट्रिस्टन स्टब्स.





