१४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या एकामागोमाग एक विक्रम मोडत आहे. अंडर-१९ विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध त्याने ७२ धावांची दमदार खेळी करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. या कामगिरीसह युवक एकदिवसीय (यूथ ODI) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. याच फॉर्मेटमध्ये वैभवने एक हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला असून, तो भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख तारा म्हणून झळकत आहे.
विराट कोहलीला मागे टाकले
वैभव सूर्यवंशीने यूथ ODI क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. सूर्यवंशीने आपल्या यूथ वनडे कारकिर्दीत अवघ्या २० डावांमध्ये १,०४७ धावा केल्या असून, त्यात ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने आपल्या यूथ ODI कारकिर्दीत २५ डावांमध्ये ९७८ धावा केल्या होत्या.
यूथ ODI मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा
भारतासाठी यूथ ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विजय झोल याने केल्या असून, त्याने ३६ डावांमध्ये १,४०४ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने आपल्या यूथ ODI कारकिर्दीत १,३८६ धावा केल्या आहेत. याशिवाय तनमय श्रीवास्तव, शुभमन गिल, उन्मुक्त चंद, सरफराज खान आणि आता वैभव सूर्यवंशी यांनीही भारतासाठी यूथ वनडे क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
१४०४ धावा – विजय झोल
१३८६ धावा – यशस्वी जायस्वाल
१३१६ धावा – तनमय श्रीवास्तव
११४९ धावा – शुभमन गिल
११४९ धावा – उन्मुक्त चंद
१०८० धावा – सरफराज खान
१०४७ धावा – वैभव सूर्यवंशी
९७८ धावा – विराट कोहली
वैभव सूर्यवंशीची शानदार कारकीर्द
वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्याच्या १८ सामन्यांच्या टी-२० कारकिर्दीत त्याने २०४.३७ च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने ७०१ धावा केल्या आहेत. त्याच्या आठ लिस्ट ए सामन्यांमध्ये ३५३ धावा आहेत. त्याने आठ सामन्यांमध्ये २०७ धावा करत प्रथम श्रेणीत पदार्पण केले आहे.





