Marathi News

मुंबई की दिल्ली? आजचा सामना रद्द झाला तर प्लेऑफमध्ये कोण जाणार? पाहा

Published:
मुंबई की दिल्ली? आजचा सामना रद्द झाला तर प्लेऑफमध्ये कोण जाणार? पाहा

मुंबई की दिल्ली? आजचा सामना रद्द झाला तर प्लेऑफमध्ये कोण जाणार? पाहा

MIvsDC : आयपीएल २०२५ च्या महत्त्वाच्या सामन्यात आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. प्लेऑफमध्ये केवळ एकच स्थान शिल्लक आहे आणि त्यासाठी मुंबई व दिल्ली यांच्यात चुरस आहे.

मुंबईने आतापर्यंत १२ सामन्यांत ७ विजय मिळवले असून त्यांचे १४ गुण आहेत. दिल्लीनेही १२ सामने खेळले असून त्यांचे १३ गुण आहेत. या दोघांमध्ये जो संघ जास्त गुणांसह फिनिश करेल, त्याला प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.

विजय मिळाल्यास मुंबईचे काम होईल सोपे

मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय आवश्यक आहे. मात्र, दिल्लीसाठी परिस्थिती तशी नाही. जर दिल्लीने हा सामना जिंकला तरी त्यांना थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार नाही, कारण त्यांचे फक्त १५ गुण होतील. दिल्लीला त्यानंतरचा पंजाब किंग्सविरुद्धचा सामनाही जिंकावा लागेल. मुंबईचा देखील पुढचा सामना पंजाब किंग्ससोबतच आहे. जर आज मुंबई हरली आणि दिल्लीलाही पंजाबविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर मुंबई आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम ४ संघांमध्ये स्थान मिळवू शकते.

मुंबईत आज पावसाची शक्यता

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. मुंबईसाठी पुढील ४ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सामना पूर्ण होईल की नाही, याबाबत निश्चित काहीही सांगता येत नाही. AccuWeather च्या माहितीनुसार, शहरात पावसाची ८०% शक्यता आहे आणि सुमारे दीड तास पाऊस पडू शकतो. तथापि, वानखेडे स्टेडियमवर आजपर्यंत एकही आयपीएल सामना रद्द झालेला नाही.

आज सामना झाला नाही तर काय होईल?


पावसामुळे जर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना झाला नाही, तर दोन्ही संघांना १-१ गुण दिले जातील. अशा परिस्थितीत मुंबईचे १५ आणि दिल्लीचे १४ गुण होतील. या गुणांसह कोणतीही टीम थेट प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी त्यांचा शेवटचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

Follow Us :GoogleNews