विमेन्स प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचा प्रवास नवी मुंबईहून वडोदऱ्याकडे पोहोचला असला, तरी डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. २० जानेवारी रोजी मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला, ज्यात त्यांना ७ विकेट्सने एकतर्फी पराभव पत्करावा लागला. मागील तीन सामन्यांतील ही मुंबई इंडियन्सची सलग तिसरी हार ठरली असून त्यामुळे आता प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणे त्यांच्यासाठी अधिक कठीण होताना दिसत आहे.
दुसरीकडे, स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाचा या हंगामात आतापर्यंत विजयाचा प्रवास पाहायला मिळत असून, त्यांनी प्लेऑफसाठी आपले स्थान आधीच पक्के केले आहे.
आरसीबीने प्लेऑफचे तिकीट निश्चित केले, मुंबई अजूनही दुसऱ्या क्रमांकावर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने आतापर्यंत मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले असून सर्व सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. आरसीबी महिला संघाने प्लेऑफसाठी आपले तिकीट पक्के केले असून, गुणतालिकेत १० गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. त्यांचा नेट रनरेट १.८८२ इतका आहे.
दुसऱ्या क्रमांकावर डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स महिला संघ आहे. मुंबईने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी ४ सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर केवळ २ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. मुंबई इंडियन्सकडे सध्या ४ गुण असून त्यांचा नेट रनरेट ०.०४६ आहे.
यूपी तिसऱ्या क्रमांकावर, तर दिल्लीही चौथ्या स्थानावर
WPL 2026 च्या गुणतालिकेतील उर्वरित तीन संघांची स्थिती पाहिली तर यूपी वॉरियर्स संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांत पराभव पत्करला आहे. यूपी वॉरियर्सकडे सध्या ४ गुण असून त्यांचा नेट रनरेट -0.483 आहे.
यानंतर चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स संघ आहे. दिल्लीनेही ५ सामने खेळले असून त्यांचे ४ गुण आहेत, मात्र त्यांचा नेट रनरेट -0.586 इतका आहे.
गुणतालिकेतील अखेरच्या स्थानावर गुजरात जायंट्स संघ आहे. गुजरातनेही ५ सामने खेळले असून त्यापैकी ३ सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर २ सामने जिंकले आहेत. गुजरात जायंट्सकडे सध्या ४ गुण असून त्यांचा नेट रनरेट -0.864 आहे.





