आपल्या हिंदू धर्मात गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर पूजेतून पूर्ण फळ मिळते. विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. विनायक चतुर्थीचे हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. हे व्रत पाळल्याने आणि त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून सुटका होते. विनायक चतुर्थीचे महत्व काय आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात…
विनायक चतुर्थीचे महत्व काय
विनायक चतुर्थी या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख-समृद्धी, ज्ञानप्राप्ती होते, अडथळे दूर होतात आणि आर्थिक संकट टळते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-शांती नांदते.
कधी आहे विनायक चतुर्थी ?
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, बुधवार, 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, विनायक चतुर्थीचे व्रत 24 डिसेंबर रोजी पाळले जाईल.
विनायक चतुर्थी पूजा विधी
- सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला.
- देवघर स्वच्छ करा, एका चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा.
- गणपतीची पूजा करण्याचा संकल्प करा.
- गणपतीला गंगाजल, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) यांनी स्नान घाला.
- चंदन, कुंकू, हळद, अक्षत, फुले (जास्वंद उत्तम), दूर्वा (21 किंवा 108 जुड्या), फळे अर्पण करा.
- मोदक, लाडू किंवा तुमच्या आवडीचा गोड पदार्थ दाखवा.
- “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. “वक्रतुंड महाकाय” किंवा इतर गणपती मंत्र म्हणा.
- गणपतीची आरती करा. शक्य असल्यास अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्र म्हणा.
- पूजेनंतर प्रसाद वाटप करा आणि गरीब व गरजूंना दान द्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





