नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकरसंक्रांत असं म्हटलं जातं. यादिवशी तिळगूळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र, ही पूजा कशी केली जाते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
सुगड म्हणजे काय ?
‘सुगड’ हा शब्द ‘सुघट’ या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘सुंदर घड’ किंवा ‘भरलेला घट’ असा होतो. हा शेतात पिकलेल्या धान्याने भरलेला मातीचा घट असतो, ज्याला धनधान्याचे प्रतीक मानले जाते. हा सण शेतीतून आलेली समृद्धी आणि भरभराट दर्शवतो.
सुगड पूजेचे महत्त्व
सुगड म्हणजे शेतात पिकलेल्या नवीन धान्याचा घट. नवीन पीक घरात आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ही पूजा केली जाते. अखंड सौभाग्य लाभावे म्हणून महिला ही पूजा करतात. संक्रांतीच्या पूजेनंतर सुवासिनींना वाण देणे हे सुवासिनींचे प्रतीक मानले जाते. तिळाला संततीवृद्धीचे प्रतीक मानले जाते. तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. तिळगुळाच्या गोडीने नात्यांतील कटुता दूर व्हावी, अशी भावना असते. ‘सुगड’ हा शब्द ‘सुघट’ (सुघटीत घड) या शब्दावरून आला आहे. नवीन धान्याने भरलेला घट म्हणजेच सुगड.
मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची?
- सुगड पूजा ठिकाण स्वच्छ करुन पाटाभोवती रांगोळी काढा, मध्यभागी स्वास्तिक काढा. पाटाला हळद-कुंकू लावा.
- काळ्या-तांबड्या रंगाचे मातीचे पाच सुगड घ्या. त्यांना हळद-कुंकू लावून सजवा.
- सुगडांमध्ये ऊस, गव्हाच्या लोंब्या, तीळ, शेंगदाणे, बोरं, गाजर, हरभरा, तीळगूळ भरा.
- पाटावर लाल वस्त्र ठेवा, त्यावर तांदूळ-गहू ठेवा. त्यावर भरलेले सुगड (कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवतात) मांडा.
- सुगडांवर हळद-कुंकू, फुले, अक्षता अर्पण करा. धूप-दीप दाखवा, नमस्कार करा.
- सुगड पूजेला तिळाचे लाडू, हलवा, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा.
- पूजा झाल्यावर सुवासिनी एकमेकींच्या घरी जाऊन वाणांची देवाणघेवाण करतात, ज्यात तिळगुळ, फळं, सुगड यांचा समावेश असतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





