MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

प्रेमानंद महाराजांचे सुरूवातीचे आयु्ष्य तुम्हाला माहिती आहे का? एक साधारण व्यक्ती कसा बनला लाखो लोकांचे श्रध्दास्थान?

Written by:Rohit Shinde
एकंदरीत प्रेमानंद महाराजांचे जीवन त्यागाने आणि भक्तीने भरलेले आहे. प्रेमानंद महाराजांचे अनेक चाहते अथवा भक्त आज आहेत. प्रेमानंद महाराजांच्या सुरूवातीच्या काळातील जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
प्रेमानंद महाराजांचे सुरूवातीचे आयु्ष्य तुम्हाला माहिती आहे का? एक साधारण व्यक्ती कसा बनला लाखो लोकांचे श्रध्दास्थान?

आजच्या घडीला प्रेमानंद महाराज लाखो भक्तांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे जीवन हे एका उत्कट आत्मिक शोधाची कथा आहे. बालपणापासूनच दिसणारा आध्यात्मिक तळ, तरुण वयात घेतलेला त्यागाचा निर्णय, वाराणसीतील कठोर साधना, राधावल्लभ संप्रदायातील दीक्षा आणि गुरुकृपेने लाभलेली प्रेमभक्ती ही त्यांच्या जीवनयात्रेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा प्रवास दाखवतो की खरी साधना, निष्ठा आणि प्रेमभावनेने कोणालाही आध्यात्मिक उंचीवर पोहोचवू शकते. प्रेमानंद महाराजांचे अनेक चाहते अथवा भक्त आज आहेत. प्रेमानंद महाराजांच्या सुरूवातीच्या काळातील जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ…

प्रेमानंद महाराजांचे सुरूवातीचे जीवन

प्रेमानंद महाराजांचा जन्म ३० मार्च १९६९ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सरसो (अख्री) गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे होय. वडील शंभू पांडे आणि आई रमा देवी हे दोघेही धार्मिक आणि भक्तिप्रवृत्तीचे होते. घरातील या आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर लहानपणापासून जाणवू लागला. बालपणीच त्यांना धर्मग्रंथ वाचन, मंत्रोच्चार आणि ध्यान यात प्रचंड रस होता. पाचव्या वर्षी त्यांनी ‘श्री सुखसागर’ या गीता प्रेसच्या पुस्तकाचा अभ्यास सुरू केला आणि श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या नामस्मरणात ते लीन झाले. नववीत शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात जीवनाच्या गूढ प्रश्नांनी घर केले. आई-वडिलांचे प्रेम कायमचे असते का, माया-मोहाचा काय अर्थ, आणि जिथे शाश्वत आनंद आहे तिकडे का जाऊ नये, असे विचार त्यांना अस्वस्थ करू लागले. शेवटी वयाच्या केवळ १५ व्या वर्षी, पहाटे ३ वाजता त्यांनी कोणालाही न सांगता घर सोडले.

घर सोडले; राधा-कृष्णाच्या भक्तीत रमले!

घर सोडल्यानंतर त्यांनी नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणून ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली आणि त्यावेळी त्यांना आनंदस्वरूप ब्रह्मचारी हे नाव देण्यात आले. पुढे त्यांना स्वामी आनंदाश्रम या नावाने संन्यासाची दीक्षा देण्यात आली. त्यांनी वाराणसीत निवास केला आणि तुलसी घाट तसेच गंगेच्या काठावर साधना सुरू केली. गंगा त्यांच्यासाठी दुसरी आई झाली होती. ते अत्यंत साध्या जीवनशैलीत राहत, दिवसातून तीन वेळा गंगा स्नान करत, उपवास, जप, ध्यान आणि कठोर साधना यांचे पालन करत. एकदा वाराणसीतील पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान करत असताना एका संताने त्यांना रासलीला पाहण्यासाठी आमंत्रित केले. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण अखेरीस त्या लीलेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांचे मन राधा-कृष्ण भक्तीत पूर्णपणे रंगून गेले.

यानंतर त्या संताने त्यांना शरणागती मंत्र दिला आणि राधावल्लभ संप्रदायात प्रवेश घडवून आणला. पुढे त्यांची गुरु भेट पुज्य श्री हित गौरांगी शरण जी महाराज यांच्याशी झाली. गुरुजींनी त्यांना सहचारी भाव आणि नित्य विहार रस यांचे निजमंत्र दिले तसेच निरंतर सेवा आणि साधनेत रत राहण्याचे मार्गदर्शन केले. प्रेमानंद महाराजांनी गुरुजींची दहा वर्षे अखंड भक्तीभावाने सेवा केली. या कालावधीत त्यांनी पूर्णतः वैराग्य, त्याग आणि प्रेमभक्तीचा मार्ग अंगीकारला. एकंदरीत प्रेमानंद महाराजांचे जीवन त्यागाने आणि भक्तीने भरलेले आहे.