Salman Khan Battle Of Galwan : सलमान खान त्यांच्या स्वॅग, स्टाइल आणि ‘भाईजान’ इमेजसाठी ओळखले जातात. पण गेल्या काही काळात त्यांनी विषयप्रधान, गंभीर छटा असलेल्या चित्रपटांकडे वळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या चाहत्यांना मात्र हा नवा अवतार तितका रुचत नसल्याचे वारंवार दिसत आहे. याच मालिकेत, सलमानचा बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी अपेक्षित केलेला टाळ्यांचा आवाज ऐकू येण्याऐवजी सोशल मीडियावर मीम्सची जोरदार लाट उसळली.
टीझरची झलक आणि चाहत्यांचा धक्का (Salman Khan Battle Of Galwan)
सलमानच्या वाढदिवशी, 27 डिसेंबरला टीझर रिलीज करण्यात आला. चाहत्यांनी ज्या थरारक, जोशपूर्ण झलकांची वाट पाहिली होती, ती मिळालीच नाही असे अनेकांचे मत आहे. युद्धभूमीचं वातावरण, माथ्यावरून वाहणारे रक्त आणि पाठीमागे सेट केलेली लढाईची फ्रेम — या सगळ्यांमध्ये सलमानचे बारीकसारीक नीटनेटके केस चाहत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. “दुश्मन समोर उभा आहे, पण केस इतके परफेक्ट कसे?” असा प्रश्न सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.
एक्सप्रेशन्सवरून मीम्सची बरसात
सलमानचे काही शॉट्स ज्या गंभीरतेने दाखवले जाणे अपेक्षित होते, तिथेच त्यांच्या एक्सप्रेशन्समुळे नेटिझन्सना विनोदाचा विषय मिळाला. अनेकांनी लिहिले की, “हे पाहून वाटतं सलमान लगेच ‘तेरे मस्तक मस्त दो नैना’ गायला लागतील!” युद्धभूमीवरील सैनिकांचे बॅकग्राऊंड सीन, लढाईची गुणवत्ता आणि दृश्यांची सुसंगतता,या सर्व बाबींवर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आणि काही सेकंदांच्या टीझरने मीम्सची भव्य लाट निर्माण केली.
फिल्मची टीम आणि वचनबद्धता
अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘बॅटल ऑफ गलवान’ ही धैर्य, शौर्य आणि बलिदानाची कथा असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटात चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमा खान यांनी हा प्रोजेक्ट प्रोड्यूस केला आहे.
सलमानचा प्रयोगशील मोड गोंधळात टाकणारा?
‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘सिकंदर’नंतर सलमानने पुन्हा वेगळ्या प्रकारातील चित्रपट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांमध्ये ना त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले, ना समीक्षकांना प्रभावित केले. त्यामुळेच अनेक चाहत्यांचे मत ” सलमानने आपला स्टाइल, स्वॅग आणि मसाला सिनेमा सोडूच नये”. आता ‘बॅटल ऑफ गलवान’ रिलीज झाल्यानंतरच खरी परीक्षा होणार आहे. सध्या मात्र टीझरच्या एका झलकनेच सोशल मीडियावर चर्चा, विनोद आणि शंका उपस्थित होत आहेत.





