भारतीयांसाठी सोने केवळ एक धातू नाही, तर परंपरा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. लग्नकार्य असो की अन्य सण उत्सव, सोन्याच्या दागिन्यांशिवाय खरेदी अपूर्ण वाटते. मात्र, एक गोष्ट सगळ्यांच्या मनात असते की आपण जे सोने खरेदी करत आहोत ते किती शुद्ध आहे? ते खरंच २२ कॅरेट आहे की २४ कॅरेट?
प्रत्यक्षात, दागिने खरेदी करताना आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की हे २२ कॅरेट किंवा २४ कॅरेट सोनं आहे. पण या दोघांमध्ये काय फरक आहे, हे फार थोड्यांना माहिती असतं. विशेषतः जेव्हा आपण दागिने बनवण्याच्या विचारात असतो, तेव्हा हे समजून घेणं खूप गरजेचं ठरतं की २२ कॅरेट सोन्यात नेमकं काय-काय मिसळलं जातं आणि हे कोणत्या प्रकारच्या दागिन्यांसाठी योग्य असतं.
जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा किंवा दागिने बनवण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की सोनार २२ कॅरेट सोन्यात नेमकं काय मिसळतात आणि या सोन्यातून कोणत्या प्रकारचे दागिने बनवणं योग्य ठरतं.
२२ कॅरेट सोन्यात काय-काय मिसळलं जातं?
२२ कॅरेट सोन्याचा अर्थ असा की त्यामध्ये ९१.६ टक्के शुद्ध सोने असते आणि उरलेले ८.३३ टक्के इतर धातूंचा समावेश असतो. ही शुद्धतेची मोजमाप पद्धत आहे, ज्याला “कॅरेट” असं म्हटलं जातं. २२ कॅरेट सोन्याला ९१६ गोल्ड देखील म्हणतात. याचा अर्थ असा की १००० पैकी ९१६ भाग शुद्ध सोना आहे.
शुद्ध सोने खूपच मऊ असते, त्यामुळे त्यातून दागिने बनवणे आणि ते दीर्घकाळ टिकवणे कठीण होते. त्यामुळे सोने अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी त्यामध्ये इतर धातूंचं मिश्रण केलं जातं.
सोनार २२ कॅरेट सोन्यात प्रामुख्याने तांबे, चांदी, झिंक आणि कधी-कधी निकेल मिसळतात. या धातूंच्या मिश्रणामुळे सोनं अधिक मजबूत होतं आणि त्यातून सुंदर डिझाइनचे दागिने तयार करता येतात.
२२ कॅरेट सोन्यातून कोणते दागिने बनवणं योग्य आहे?
२२ कॅरेट सोनं विशेषतः अशा दागिन्यांसाठी उत्तम असतं, जे तुम्ही कधीमधी किंवा लग्नसमारंभ, सण-उत्सव अशा खास प्रसंगी घालता. उदा. हार, कानातली, बांगड्या, मंगटिका, बाजूबंद, कंबरपट्टा इत्यादी.
या दागिन्यांना शोभा, डिझाइन आणि मजबुती आवश्यक असते आणि हे सर्व २२ कॅरेट सोनं उत्तम प्रकारे देते.
पण जर तुम्ही असे दागिने बनवू इच्छित असाल, जे तुम्हाला रोज घालायचे असतील जसे की अंगठी, साखळी, ऑफिस किंवा डेली वियर कानातली तर २२ कॅरेटच्या ऐवजी १८ किंवा १४ कॅरेट सोनं वापरणं अधिक चांगलं ठरेल, कारण ते अधिक मजबूत असतं.
२४ कॅरेट सोन्याची किंमत सर्वाधिक असते, कारण ते पूर्णतः शुद्ध असतं. मात्र, २२ कॅरेट सोनं थोडं स्वस्त असून दागिन्यांसाठी अधिक उपयोगी असतं.





