तुमची मुलं सरक्षित आहेत का? विक्रोळीत स्पीकरनं घेतला तीन वर्षांच्या चिमुरडीचा बळी, नाशकात चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून लहानग्याचा मृत्यू

Written by:Smita Gangurde
Published:
लहान मुलांनी खेळण्यासाठी पुरेशी जागा, मैदानांची कमरतता असल्यानंही असे प्रकार घडताना दिसतायेत.अशा घटना घडू नयेत यासाठी मुलांना नियमांची योग्य शिकवण देण्याची आणि त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आता व्यक्त होतेय.
तुमची मुलं सरक्षित आहेत का? विक्रोळीत स्पीकरनं घेतला तीन वर्षांच्या चिमुरडीचा बळी, नाशकात चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून लहानग्याचा मृत्यू

मुंबई – प्रजासत्ताक दिनी रस्त्यावर लावलेला स्पीकरनी तीन वर्षांच्या लहानगीचा बळी घेतलाय. तर नाशिकमध्ये बाल्कनीतून पडल्यानं एका लहानग्याला जीव गमवावा लागलाय. गेल्या काही दिवसांतल्या या घटना पाहता तुमची मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात पालकांना सर्वाधिक घोर असतो तो त्यांच्या पोटच्या मुलांच्या सुरक्षेचा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडतायेत की त्यातून तुमची मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडलाय.

विक्रोळीत काय घडलं ?

मुंबईच्या विक्रोळी उपनगरात प्रजासत्ताक दिनानिमित्त लावलेला स्पीकर एका चिमुकलीचा काळ बनून आला. विक्रोळीमधल्या या स्पीकर्सनी 3 वर्षाच्या बाळाचा जीव घेतलाय. विक्रोळीतल्या टागोर नगरमधील एका गल्लीतून जात असताना, ही चिमुकली धावली असावी, त्याचवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले स्पीकर्स तिच्या इवल्याशा जीवावर पडले. उपस्थितांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेचा तपास केला जातोय.

नाशिकमध्ये काय घडलं?

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातही अशीच ह्रदयद्रावक घटना घडलीय. नरहरीनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून कोसळून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कियांश पबेदाडे असं मृत मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. खेळताना अचानक तोल जाऊन कियांश थेट खाली पार्किंगमध्ये कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.

पुण्यात काय घडलं?

पुण्यातल्या ‘जॉय नेस्ट’ सोसायटीमध्येही एका लहानग्याचा एका कारमुळे जीव गेलाय. सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या ५ वर्षांच्या निष्कर्ष अश्वत स्वामी या चिमुरड्याला एका भरधाव कारने चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की, निष्कर्षाचा जागीच मृत्यू झाला.

दौंडमध्ये काय घडलं?

दौंडमध्येही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. शहरातील जनता कॉलनी परिसरात सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागे डांबरीकरणाचे काम सुरू असताना अपघात झाला. या रोड रोलरखाली सापडून आर्यन जाधव या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.आर्यनची आई याच डांबरीकरणाच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होती. काम लवकर उरकण्याच्या नादात रोड रोलर चालकाने अतिवेगाने रोलर फिरवल्यामुळे आर्यन रोड रोलरखाली सापडला आणि त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित रोड रोलर चालक घटना स्थळावरून फरार झालाय. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरणाचे काम सुरू असताना रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला नव्हता.कोणतेही सूचनाफलक, कठडे किंवा सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.

पालकांनी काय करावं?

या सगळ्या घटना पाहता मुलांकतडे पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आता व्यक्त होतेय. लहान मुलांनी खेळण्यासाठी पुरेशी जागा, मैदानांची कमरतता असल्यानंही असे प्रकार घडताना दिसतायेत.अशा घटना घडू नयेत यासाठी मुलांना नियमांची योग्य शिकवण देण्याची आणि त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आता व्यक्त होतेय.