मे महिना संपतोय आणि आता दोन दिवसांनी जून महिना सुरू होणार आहे. या जून महिन्यात बँकेचे कामकाज किती दिवस चालणार? असा सवाल अनेकजण उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत  नवीन महिना सुरू होण्याआधी अनेकजण सुट्ट्यांचे नियोजन करतात. विशेषतः जूनपासून पावसाळ्याची सुरुवात होत असल्यामुळे काहीजण प्रवासाचे प्लॅन करतात, तर काहीजण आर्थिक नियोजनात व्यस्त असतात आणि त्यांना बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतात. पण, आता जर तुमची महत्वाची बँकेशी संबंधित काही कामे असतील तर ती तात्काळ पूर्ण करा, जून महिन्यात देशभरातील बँका वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये काही महिन्याच्या सुट्ट्या, काही प्रादेशिक तर काही राष्ट्रीय पातळीवरील सुट्ट्यांचा समावेश आहे.

ऑनलाईन पेमेंट्स आणि युपीआय सुविधा सुरू राहणार

आता बँका बंद राहणार तर आर्थिक व्यवहारांचं काय होणार असा सवाल अनेकांना पडला आहे, अशा परिस्थितीत आता जरी बँका बंद असतील, तरी ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. ऑनलाइन बँकिंग, UPI, मोबाईल अ‍ॅप्स आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अनेक सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरी बसून बँकेची अनेक कामे सहजपणे पूर्ण करू शकता. शिवाय तुम्हाला गुगल पे अथवा फोन पे सारख्या सुविधांच्या माध्यमातून तुमचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवता येणार आहेत.

जूनमधील सुट्ट्यांची यादी

6 जून 2025

ईद-उल-अधा (बकरी ईद) निमित्त तिरुवनंतपुरम आणि कोची येथील बँका बंद राहतील.

7 जून 2025

बकरी ईद (ईद-उल-जुहा) निमित्त आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इम्फाळ, जयपूर, कोलकाता, जम्मू, मुंबई, कानपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद राहतील.
11 जून 2025
संत गुरू कबीर जयंती आणि सागा दावा निमित्त गंगटोक आणि शिमला येथील बँकांना सुट्टी असेल.
संत गुरू रथयात्रा (कांग रथयात्रा) निमित्त भुवनेश्वर आणि इम्फाळ येथील बँका बंद राहतील.

30 जून 2025

रेमना नीनिमित्त मिझोराम राज्यातील बँका बंद राहतील. (रेमना नी म्हणजेच शांतता दिन दरवर्षी 30 जून रोजी साजरा केला जातो.)

14 आणि 28 जून 2025

दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

पाच रविवार – 1, 8, 15, 22 आणि 29 जून 2025

जून महिन्यात एकूण पाच रविवार असून या दिवशीही बँका बंद असतील.

अशा काळात आर्थिक व्यवहारांचा मोठा खोळंबा होऊ शकतो, अशा परिस्थितीत नागरिकांनी आधीच आपली बँकेच्या कार्यालयाशी निगडीत महत्वाची कामे उरकून घेणे फायद्याचे ठरते.

टीप; बँकांच्या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकसारख्या नसतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, प्रत्येक राज्यातील सण व विशेष दिवस लक्षात घेऊन सुट्ट्यांची यादी वेगवेगळी असते. या सुट्ट्यांची अधिकृत आणि तपशीलवार यादी RBI च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.