Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अधिक पारदर्शकता यावी याकरिता राज्य सरकारकडून काही महिन्यांपूर्वी ही केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि इतर काही समस्यांमुळे अनेकांच्या ई केवायसी दरम्यान काही चुका झाल्या आहेत. परिणामी अनेक महिलांचा मागील काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता थकला आहे. या महिलांसाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसी करा
या योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या लाभार्थी महिलांनी केवायसी केली आहे, मात्र त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत, अशा महिलांना आता पुन्हा एकदा आपल्या ई केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत लाभार्थी महिला ऑनलाईन पोर्टच्या माध्यमातून केवायसीमध्ये दुरुस्ती करू शकणार आहेत, याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे (Ladki Bahin Yojana)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी! e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.






