जळगाव – तुमचा विश्वास बसणार नाही मात्र महाराष्ट्रात एका बँकेत कर्ज म्हणून चक्क महिलांना शेळी दिली जातेय. या बँकेत पैशांचे व्यवहार होत नाहीत, तर शेळ्या देण्याघेण्याचे व्यवहार होतात तेही पैशांविना. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त गरीब, विधवा, परितक्त्या महिलांना या बँकेचा लाभ झालाय.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये ही शेळ्यांची बँक चालवण्यात येतेय. या बँकेतून शेळ्यांचं कर्ज घेण्यासाठी परिसरातील महिला दररोज गर्दी करतात. यातून हा महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळतेय.
कसं घेता येतं शेळीचं कर्ज?
या ठिकाणी शेळीचं कर्ज घेणाऱ्या महिलांना शेळी अशीच दिली जात नाही. त्यापूर्वी या महिलांना शेळी पालनाचं प्रशिक्षण देण्यात येतं. पुण्यातील सेवा सहयोग फाऊंडेशनच्या वतीनं या महिलांना शेळी पालनाचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतर या महिलांना शेळी घरी नेण्याची परवानगी देण्यात येते. या शेळीच्या दुधातून आणि लोकरीतून या महिलांना उत्पन्न मिळतं.
शेळीच्या बदल्यात द्यावं लागतं करडू?
या महिलांना शेळी देताना त्यांना एकच अट घालण्यात येते. शेळीला घरी सांभाळण्यासाठी नेल्यानंतर 6 किंवा 9 महिन्यांनी या शेळीला होणाऱ्या करड्यांमधून एक करडू बँकेला परत करावं, अशी ही अट असते.
हे करडू मोठं झाल्यानंतर ही शेळी दुसऱ्या कुठल्यातरी महिलेला रोजगारासाठी देण्यात येतं.
महिलांसाठी एटीएम ठरतायेत शेळ्या
या महिलांना शेळी पालनातून मोठा व्यवसायच मिळाला आहे. वर्षभर शेळी सांभाळल्यानमंतर तिला 3 ते 4 करडी होतात. त्यातील एक बँकेला परत केलं तरी उर्वरित करडी विकण्याची संधी या महिलांना मिळते. या करड्यांच्या विक्रीतून साधारण 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न या महिलांना मिळतंय. त्यामुळे ही बकऱ्यांची बँक या महिलांसाठी एटीएमच ठरलीय. आता या महिलांनी एकत्र येत गिरणा परिसर महिला पशुपालन उत्पादन कंपनीच स्थापन केलीय.
कशी मिळते महिलांना संधी?
या परिसरातील इच्छुक महिला या संस्थेकडे नोंदणी करतात, त्यासाठी अत्यंत कमी पैशांत नोंदणी करता येते आणि करार करण्यात येतो. त्यानंतर शेळ्यांची बँक गर्भवती शेळी पालनपोषणासाठी या महिलांना देते. 40 महिन्यांत या महिन्यांना 4 करडी बँकेला परत करायची असतात. उरलेल्या करड्यांच्या विक्रीतून त्या चांगले पैसे मिळवतायेत.
स्थानिक ठिकाणी असा प्रकल्प राबवून परिसरातील शेकडो महिलांना यामुळं स्वावलंबी होण्यात यश आलेलं आहे.





