Mumbai Railway Local train – मुंबईसह उपनगरात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई उपनगरातील मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, पावसाचा परिणाम मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनवर दिसून आला. साधारण सकाळी ११ वाजल्यापासून लोकल सेवा बंद होती. मुसळधार पावसामुळे व पाणी साचल्यामुळं मध्य रेल्वेवरील गाड्यांची सेवा थांबवण्यात आली होती. मात्र आता लोकलबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. साधारत ७.३० वाजता लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.
सीएसएमटी ते ठाणे लोकल सेवा ७.२८ वा. पुन्हा सुरु
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा सायं. ७.२८ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली असू,न ठाण्याकडे जाणारी पहिली गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायं. ७.२८ वाजता सोडण्यात आली. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान मुख्य मार्गावरील अप व डाउन फास्ट आणि स्लो लाईनवरील उपनगरी रेल्वे सेवा अनुक्रमे सकाळी ११.२५ व ११.४० वाजल्यापासून बंद करण्यात आल्या होत्या. तसेच हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवाही सकाळी ११.२० वाजल्यापासून स्थगित करण्यात आली.
पावसाचा हार्बर मार्गावरही परिणाम…
मात्र, मुख्य मार्गावरील ठाणे ते कसारा/कर्जत, हार्बर मार्गावरील पनवेल ते मानखुर्द आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे ते वाशी दरम्यान उपनगरी सेवा सुरु होत्या. तसेच नेरुळ/बेलापूर ते उरण दरम्यानच्या उपनगरी रेल्वेसेवाही देखील सुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे /गोरेगाव दरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा, जी सकाळी ११.२० वाजल्यापासून बंद होती, ती दुपारी १.३० वाजता पुन्हा सुरू करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, वडाळा रोड, वाशी आणि पनवेल स्थानकांवर मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. महाव्यवस्थापक धर्मवीर मीना तसेच विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.





