नवीन घर घेण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक खरेदीदाराच्या मनात उत्सुकता आणि चिंता या दोन्ही गोष्टी असतात. आयुष्यभराच्या बचतीतून, कर्जाच्या हप्त्यांतून किंवा गुंतवणुकीतून घर घेताना प्रत्येक जण अधिकाधिक चांगली जागा मिळावी अशी अपेक्षा बाळगतो. मात्र, या उत्साहाचा गैरफायदा अनेक बिल्डर घेताना दिसतात. जाहिरातींमध्ये मोठमोठ्या आकड्यांनी दाखवलेलं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षात वापरता येणारी जागा यात मोठी तफावत असते. या तफावतीमुळे अनेक फ्लॅट खरेदीदारांना लाखो रुपयांचा तोटा होतो.
बिल्ड-अप एरिया म्हणजे काय
फ्लॅटविषयक जाहिरातींमध्ये बिल्ड-अप एरिया हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. बिल्ड-अप एरिया म्हणजे घराच्या बाहेरील भिंतींसह संपूर्ण बांधकामाची जागा. यात भिंतींची जाडी, बाल्कनी, ड्राय एरिया, कधी कधी बाहेरील पॅसेजचा काही भागसुद्धा दाखवला जातो. त्यामुळे खरेदीदाराला जास्त जागा मिळत असल्याचा आभास निर्माण होतो. परंतु या संख्येत अनेक अशा जागांचा समावेश असतो, ज्या वापरकर्त्याने प्रत्यक्षात वापरता येत नाहीत.
या उलट कार्पेट एरिया म्हणजे निव्वळ प्रत्यक्षात उपयोगात येणारी जागा. घरात आपण पाऊल टाकून ज्यावर उभे राहतो, जिथे फर्निचर ठेवतो, जिथे प्रत्यक्ष राहतो ती जागा म्हणजे कार्पेट एरिया. यात बेडरूम, हॉल, किचन, वॉशरूम आणि घरातील आतील पॅसेजचा समावेश होतो. सामायिक जिने, लिफ्ट, लॉबी, टेरेस किंवा क्लब हाऊसचा भाग कार्पेटमध्ये धरला जात नाही. त्यामुळे घर किती मोठं आहे याचा वास्तविक अंदाज कार्पेट एरियावरूनच घेतला पाहिजे.
अनेक बिल्डर कार्पेट एरियावर 20 ते 30 टक्क्यांहून अधिक ‘लोडिंग’ लावतात आणि त्या आधारे बिल्ड-अप एरिया सांगतात. हा प्रकार ग्राहकांच्या नजरेतून निसटतो. उदाहरणार्थ, एखाद्या फ्लॅटचा कार्पेट एरिया 500 स्क्वेअर फूट असेल तर बिल्डर तो 600 किंवा 650 स्क्वेअर फूट म्हणून जाहिरात करतो. ग्राहकाला वाटतं की चौरस फुटाचा दर परवडणारा आहे, पण प्रत्यक्षात त्याला मिळणारी जागा मात्र कमी असते. यामुळे किंमत जास्त देऊनसुद्धा छोटं घर मिळाल्याचा फटका बसतो.
काही गोष्टींची काळजी घ्यावी
फ्लॅट खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर ही फसवणूक टाळता येऊ शकते. करारनामा तपासणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. रेरा (RERA) नुसार प्रोजेक्टमध्ये दिलेला कार्पेट एरिया स्पष्टपणे उल्लेखलेला असणे गरजेचे आहे. करारात वापरलेले शब्द, क्षेत्रफळाचे प्रकार आणि त्यातील फरक हा खरेदीदाराने नीट समजून घेतला पाहिजे.
याशिवाय जागेची प्रत्यक्ष मोजणी करणेही महत्वाचे आहे. शक्य असल्यास जाणकार आर्किटेक्ट किंवा मोजणीतील तज्ञ व्यक्तीला सोबत घेऊन साइटवर मोजणी करून घ्या. यामुळे बिल्डरने सांगितलेले क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष जागा यात फरक आहे का, हे लगेच समजते. प्रोजेक्टची रेरा वेबसाइटवरील नोंदणीही पाहणे आवश्यक असते. मंजूर नकाशा, कार्पेट एरिया आणि इतर तपशील अधिकृत नोंदणीत उपलब्ध असतात, त्याची तुलना करावी.
फ्लॅट बुक करण्यापूर्वी बिल्डरला स्पष्ट प्रश्न विचारणे अत्यंत गरजेचे आहे. मी ज्या किंमतीवर सही करणार आहे, त्यात मला किती नेट कार्पेट मिळत आहे, याचं थेट उत्तर मिळालं पाहिजे. हा मुद्दा स्पष्ट झाला नाही, तोपर्यंत करारावर स्वाक्षरी करणे धोक्याचे ठरू शकते.
घराचा ताबा मिळाल्यावर प्रत्यक्ष घर लहान वाटत असल्याची अनेकांची तक्रार असते. त्यावेळी पश्चात्ताप करून काहीही साध्य होत नाही. म्हणून घर खरेदी करण्यापूर्वीच डोळसपणे विचार करणे आवश्यक आहे. कार्पेट आणि बिल्ड-अप या दोन संकल्पनांचा योग्य फरक समजून घेतल्यास, ग्राहक मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून सहज बचाव करू शकतो.
स्वतःचं घर घेणे हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे घाईगर्दीत किंवा जाहिरातीत दिसणाऱ्या मोठ्या आकड्यांनी प्रभावित न होता, योग्य माहिती घेऊनच निर्णय घेतल्यास आपली कष्टाची कमाई सुरक्षित राहू शकते.






