सध्या आयटी क्षेत्रात नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. जागतिक आर्थिक मंदी, खर्च कपात आणि ऑटोमेशनमुळे अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक नोकऱ्यांची गरज कमी होत आहे. अनेक प्रकल्प स्थगित किंवा रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नवीन कौशल्ये आत्मसात न केल्यास स्पर्धेत टिकणे कठीण बनले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सतत कौशल्यवृद्धीवर भर द्यावा, नवीन तंत्रज्ञान शिकावे आणि बदलत्या बाजारपेठेच्या मागणीनुसार स्वतःला अद्ययावत ठेवावे, हेच आजच्या परिस्थितीत आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत एक चिंता वाढविणार अहवाल समोर आला आहे.

डिसेंबरपर्यंत 50 हजार नोकऱ्या जाणार?

एका अहवालानुसार, वर्ष 2025 च्या अखेरपर्यंत सुमारे 50 हजारांहून अधिक कर्मचारी नोकरी गमावू शकतात. अनेक कंपन्यांनी आधीच मोठ्या प्रमाणावर ‘सायलेंट ले-ऑफ’ म्हणजेच शांतपणे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जुलै महिन्यात घोषणा केली होती की, मार्च 2026 पर्यंत ते त्यांच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच 12 हजार लोकांना कामावरून कमी करतील. मात्र, ही परिस्थिती फक्त टीसीएसपुरती मर्यादित नाही. इतर अनेक मोठ्या आणि मध्यम स्तरावरील आयटी कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा देण्यास किंवा नवीन नोकरी शोधण्यास सांगत आहेत.

अंदाजानुसार, 2023 आणि 2024 या दोन वर्षांत जवळपास 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. ही संख्या चालू वर्षात दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

AI चा आयटीतील नोकऱ्यांवर परीणाम

कंपन्या आता आपल्या व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर करत आहेत. त्यामुळे अनेक इंजिनियरिंग आणि पुनरावृत्ती होणारी कामं ऑटोमेशनकडे वळत आहेत, आणि मानवी कामगारांची गरज कमी होत आहे. TCS आणि Accenture यांनी मिळून आतापर्यंत जागतिक स्तरावर 23 हजारांहून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. Accenture ने आपल्या खर्चात कपात करण्यासाठी 865 दशलक्ष डॉलर्सच्या (₹7200 कोटींच्या) योजनेअंतर्गत जून ते ऑगस्ट दरम्यान 11,000 कर्मचाऱ्यांना कमी केलं.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे आयटी क्षेत्रातील पारंपरिक नोकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक कामे आता ऑटोमेशनद्वारे केली जात असल्याने मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होत आहे. कोडिंग, डेटा विश्लेषण, टेस्टिंग आणि सपोर्ट यांसारखी कामे AI प्रणालींनी वेगाने आणि अचूकपणे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपन्या खर्च वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. त्यामुळे आयटीतील कर्मचाऱ्यांची धाकधुक वाढली आहे.