Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून सुटका होणार; थंडीत घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
कडाक्याच्या थंडीपासून आता महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण थंडीत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून सुटका होणार; थंडीत घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

उत्तरेकडील भागात शीत प्रवाह आणि दक्षिणेकडे ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रात हवामान बदलले आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याच्या चर्चा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगामी काही दिवसांत किमान तापमान तुलनेने जास्त राहणार असून कडाक्याच्या थंडीची शक्यता नसली तरी पहाटे आणि रात्री गारठा जाणवणार असल्याचा अंदाज आहे.

नागरिकांची कडाक्याच्या थंडीपासून सुटका होणार !

राज्यात उद्या अंशतः ढगाळ हवामान असेल. यासह किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांत सकाळच्या वेळी धुरकट हवामान राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आणि संध्याकाळपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र होईल. उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह सध्या थांबले असून, त्याचा थेट परिणाम राज्यातील तापमानावर होत आहे. ढगाळ हवामानामुळे अनेक भागांत धुके आणि दव पडण्याची स्थिती कायम आहे. काही ठिकाणी रात्री उशिरा आणि पहाटे हलक्या पावसाच्या थेंबांनी हजेरी लावल्याचेही आढळून आले आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा पारा 12 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जानेवारीत अपेक्षित असलेली थंडी जाणवत नाही. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात पहाटे ढगाळ हवामानासह धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी तापमान काहीसे कमी राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर हवामानात गारवा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्याची काळजी घ्या; IMD चा नागरिकांना सल्ला

तापमानात वाढ झाली असली तरी अचानक हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पहाटे आणि रात्री गरम कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अचानक वाढणारे तापमान आणि मध्येच थंडी यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत .अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय प्रकृती बिघडल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अशा काळामध्ये अत्यंत जरूरीचे आणि महत्वाचे ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews