मोबाईल, TV च्या किंमती महागणार? ग्राहकांच्या खिशाला चाप

Published:
येत्या दोन महिन्यात या वस्तू तब्बल 30 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.  मेमरी चिप्सच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ हे यामागील प्रमुख कारण आहे.
मोबाईल, TV च्या किंमती महागणार? ग्राहकांच्या खिशाला चाप

नवीन वर्षात तुम्हीही मोबाईल टीव्ही लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे.. येत्या दोन महिन्यात या वस्तू तब्बल 30 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.  मेमरी चिप्सच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ हे यामागील प्रमुख कारण आहे.

सॅमसंग, व्हिवो, नथिंगसारख्या मोठ्या कंपन्यांसह टीव्ही निर्माते आणि लॅपटॉप ब्रँड्सही यामुळे प्रभावित होत आहेत. काही आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी थेट मोबाईलच्या किमती वाढवल्या असून, तर काही कंपन्यांनी सवलती, कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर्स कमी करत अप्रत्यक्षपणे दरवाढ लागू केली आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणे स्वस्तात फोन मिळणे अवघड होणार असल्याचे चित्र आहे.

टीव्ही सुद्धा महागणार

स्मार्टफोनपुरतेच नाही, तर टीव्ही बाजारालाही दरवाढीचा फटका बसत आहे. मेमरी चिप्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांचा पुरवठा मर्यादित असल्याने टीव्ही उत्पादक टप्प्याटप्प्याने किमती वाढवत आहेत. उत्पादन खर्चात वाढ, आयात खर्च आणि पुरवठा साखळीवरील ताण यामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे उद्योग क्षेत्रातून सांगितले जात आहे. स्मार्टफोन आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा बाजार असलेल्या भारतात याचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटतील.

2026 मध्ये स्मार्टफोन विक्रीत घट होऊ शकते

लॅपटॉप बाजारातही परिस्थिती वेगळी नाही. किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांतच लॅपटॉपच्या किमती 5 ते 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरवाढीचा थेट परिणाम मागणीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन’च्या मते, जर किमती अशाच वाढत राहिल्या तर 2026 मध्ये स्मार्टफोन विक्रीत घट होऊ शकते. विशेषतः 20 हजार रुपयांखालील, सर्वाधिक मागणी असलेल्या सेगमेंटमध्ये विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

एकूणच, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महाग होत असताना ग्राहकांना खरेदीचा निर्णय अधिक विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. आगामी दरवाढ लक्षात घेता, गरज असल्यास लवकर खरेदी करणे किंवा बजेटनुसार पर्याय शोधणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.