गणेशोत्सवानिमित्त काही रेल्वे गाड्यांत मिळणार मोदक; रेल्वे केटरींग कॉर्पोरेशनचा निर्णय!

Written by:Rohit Shinde
Published:
रेल्वेकडून गणेश भक्तांच्या सोयीसाठी यावेळी विशेष नियोजन केले जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. निर्णयांचे स्वागत केले जात आहे.
गणेशोत्सवानिमित्त काही रेल्वे गाड्यांत मिळणार मोदक; रेल्वे केटरींग कॉर्पोरेशनचा निर्णय!

2025 चा गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. अवघ्या चार आठवड्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सवकाळात मुंबई ते कोकण मार्गावर प्रवास गोड करण्यासाठी आयआरसीटीसीने तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोदक वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे श्रींच्या आगमनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वाटेतच प्रसाद मिळणार आहे. या निर्णयावर प्रवाशांकडून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे.

तेजस एक्सप्रेस, वंदे भारतमध्ये मोदक मिळणार

प्रादेशिक खाद्यसंस्कृतीला वाव देण्यासह सर्वसामान्यांचा प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गाडी क्रमांक २२२२९/३० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-सीएसएमटी वंदे भारत आणि गाडी क्रमांक २२११९/२० सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मोदकांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर, अर्थात बुधवार, २७ ऑगस्ट ते शनिवार, ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशी या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीत हे वाटप करण्यात येईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

प्रवाशांसाठी विशेष सुविधांचे नियोजन होणार!

गर्दीच्या हंगामात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘जनता खाना’ अर्थात २० रुपयांत पुरी-भाजी देण्यात येते. अद्याप याबाबतच्या सूचना रेल्वे मंडळाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र उत्सवकाळात प्रवासी गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या मागणीचा विचार करता त्याची तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, बोरिवली, वांद्रे अशा मोठ्या रेल्वे स्थानकांसाठी आयआरसीटीसीच्या व्हेंडरला सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्सवकाळात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या नियमित तसेच विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना आयआरसीटीसीने सर्व व्हेंडरला दिल्या आहेत.कोकणात धामधूमीत गणपती उत्सव साजरा केला जातो.

रेल्वेकडून गणेश भक्तांच्या सोयीसाठी यावेळी विशेष नियोजन केले जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. निर्णयांचे स्वागत केले जात आहे.