मुंबईकरांनो! रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं वेळापत्रक ‘हे’ वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
अशा प्रकारचे देखभाल मेगा ब्लॉक्स, इन्फ्रास्ट्रक्चरच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
मुंबईकरांनो! रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं वेळापत्रक ‘हे’ वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक 20.07.2025) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दरम्यान, मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ वाजल्यापासून १५.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद लाईनवर वळवण्यात येतील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत विशेष ट्रेन

घाटकोपर स्थानक येथून सकाळी १०.१९ वाजल्यापासून १५.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या, विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दुसरीकडे हार्बर रेल्वेवर सुद्धा मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी १६.४० आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.