Marathi News

मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं ‘हे’ वेळापत्रक वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Written by:Astha Sutar
Last Updated:
हा मेगा ब्लॉक देखभाल व पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय?, मग रेल्वेचं ‘हे’ वेळापत्रक वाचा, मेगा ब्लॉक कुठे?

Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, रविवारी (दिनांक 27.0. 2025) रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, अन्यथा तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दरम्यान, मध्य रेल्वेवर सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. मुलुंड स्थानक येथून १०.४३ ते १५.५३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या /अर्धजलद ट्रेन, मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून १०.३६ ते १५.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या/अर्ध जलद ट्रेन, कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दुसरीकडे हार्बर रेल्वेवर सुद्धा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (पोर्ट लाईन वगळून) आणि पनवेल येथे सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ५.०५ पर्यंत ब्लॉक राहील. पनवेल येथून १०.३३ ते १७.०७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा व सीएसएमटी येथून ०९.४५ ते १५.४४ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्यात.

दुसरीकडे पनवेल येथून ११.०२ ते १६.२६ पर्यंत ठाणे कडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून १०.०१ ते १६.२४ पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी विभागात विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews