National Onion Bhavan : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे. आतापर्यंत कांदा आयात आणि निर्यात, निर्यात निर्बंध, नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉक आणि किंमत नियंत्रण यासंबंधीचे सर्व निर्णय शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतले जात होते. मात्र आता हे सर्व निर्णय शेतकरी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हितासाठी घेतले जातील. कारण आता भारतातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे हे कांदा भवन उभारण्यात येईल. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. आजपर्यंत कांदा शेती ही एक अनिश्चित आणि कर्जबाजारी पीक होती. परंतु राष्ट्रीय कांदा भवनाच्या स्थापनेमुळे कांदा शेती एक विश्वासार्ह, शाश्वत, फायदेशीर आणि सुरक्षित पीक बनेल. असा विश्वास भरत दिघोळे यांनी व्यक्त केला.
५ कोटी खर्च अपेक्षित- National Onion Bhavan
राष्ट्रीय कांदा भवन सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जयगाव येथे दोन एकर जागेवर उभारण्यात येईल. आणि भविष्यात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाईल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या देणग्यांमधून हा निधी उभारला जाईल. राष्ट्रीय कांदा भवन राज्य, देश आणि परदेशातील शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी, पत्रकार, धोरणकर्ते आणि कांदा तज्ञांना निवास आणि बोर्डिंग सुविधा, बैठक आणि परिषद कक्ष, इंटरनेट सुविधा, संगणक, लॅपटॉप आणि कांदा चाचणी प्रयोगशाळा यासह सर्व आधुनिक सुविधाने सुसज्ज असेल.
सर्व निर्णय शेतकरी नेतृत्वाखाली होणार –
भारत जगातील आघाडीचा कांदा उत्पादक देश असूनही, आतापर्यंत कांदा आयात आणि निर्यात, निर्यात निर्बंध, नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉक आणि किंमत नियंत्रण यासंबंधीचे सर्व निर्णय शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवनाच्या स्थापनेनंतर, हे सर्व निर्णय शेतकरी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हितासाठी घेतले जातील असे दिघोळे यांनी स्पष्ट केले. कांदा बियाणे संशोधन आणि गुणवत्ता नियंत्रण, वनस्पती पोषण, लागवडीनंतर खते आणि कीटकनाशकांचे वैज्ञानिक नियोजन, उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी आणि संपूर्ण पीक देखरेख अशी सर्व कामे राष्ट्रीय कांदा भवनातून किफायतशीर आणि सामूहिक पद्धतीने पार पाडली जातील असे सांगण्यात आले आहे. National Onion Bhavan
राज्य आणि देशभरातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा विक्री व्यवहार राष्ट्रीय कांदा भवनातून नियंत्रित केले जातील जेणेकरून पूर्णपणे पारदर्शक कारभार करता येईल, कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक, शोषण किंवा लूटमार होणार नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत शेतकरी आघाडीवर असतील. शेतकऱ्यांपासून देशांतर्गत आणि परदेशी ग्राहकांना थेट कांदा विक्री व्यवस्था स्थापन केली जाईल, ज्यामुळे दलालांची साखळी कमी होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत फायदे मिळतील.






