सावधान! कमी वयातील मुलांसाठी स्मार्टफोनचा वापर ठरतोय घातक; आत्महत्येचे विचार आणि….

Written by:Rohit Shinde
Published:
वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. त्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
सावधान! कमी वयातील मुलांसाठी स्मार्टफोनचा वापर ठरतोय घातक; आत्महत्येचे विचार आणि….

आजच्या आधुनिक युगात लहान मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. शिक्षण, मनोरंजन, ऑनलाईन गेम्स आणि सोशल मीडियामुळे मुलं लहान वयातच स्मार्टफोनकडे आकृष्ट होत आहेत. याचा उपयोग शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी होतो खरा, पण त्याचे तोटेही मोठे आहेत. जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवल्यामुळे मुलांचे डोळे, झोप आणि शारीरिक आरोग्य बिघडते. अभ्यासावर लक्ष कमी होते, एकाग्रता ढासळते आणि मानसिक ताण वाढतो. बाहेर खेळणे, समाजात मिसळणे कमी होऊन मुलं एकटेपणाकडे झुकतात. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर मर्यादित ठेवून पालकांनी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये पालकांची झोप उडविणारा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

लहान मुलांसाठी स्मार्टफोन अत्यंत धोकादायक

एका नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वय वर्षे 13 आधी स्मार्टफोनचा वापर  करणाऱ्या मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता इतर मुलांपेक्षा जास्त असते. या संशोधनात 1 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यानंतर संशोधनाचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत. लवकर स्मार्टफोन वापरामुळे 12 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 18 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये आत्महत्येचे विचार, जास्त आक्रमकता, वास्तवापासून दूर जाणे, भावनांवर नियंत्रण नसणे आणि कमी आत्मसन्मान यांसारख्या समस्या सामान्यतः आढळून येत असल्याचे समोर आले आहे. संशोधनात असेही दिसून आले आहे की, या मानसिक आरोग्याच्या समस्यांमागे सोशल मीडियाच्या लवकर संपर्कात येण्यामुळे होणारी सायबरबुलिंग, कमी झोप आणि तणावपूर्ण कौटुंबिक संबंध ही प्रमुख कारणे आहेत.

लहान मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा!

आजच्या काळात लहान मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सतत फोन वापरल्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर, मेंदूवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, खेळणे व बाहेरची क्रियाशीलता कमी होते. मुलं एकाकीपणाकडे वळतात व मानसिक ताण वाढतो. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांना खेळ, वाचन आणि सर्जनशील उपक्रमांकडे वळवावे. स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे टाळता आला नाही तरी वेळेचे बंधन घालणे आवश्यक आहे. लहान वयात तंत्रज्ञानाचा अतिरेक टाळणे हाच योग्य मार्ग आहे. म्हणूनच “लहान मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवा आणि त्यांच्या भविष्यासाठी काळजी घ्या.”