सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरमुळे निधन झाल्याची बातमी आज सकाळी समोर आली. अलीकडच्या काळात कॅन्सरमुळे सेलिब्रिटींचेच नव्हे तर अनेक सामान्य माणसांना देखील जीव गमावावा लागत आहे. कॅन्सर हा आजार सध्या जगभरात वेगाने वाढताना दिसतो आहे. अनेकदा कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे उपचारासाठी उशीर होतो. अनेकदा जीव गमावावा लागतो. नेमका कॅन्सर का वाढतोय, प्राथमिक लक्षणं काय असतात, काय उपचार करावेत…याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कॅन्सरची सुरुवातीच्या काळातील लक्षणे
काही वेळा डोकेदुखी, थकवा, वारंवार होणारा ताप, किंवा वजन कमी होणे ही साधी वाटणारी लक्षणेसुद्धा गंभीर आजाराची चिन्हे असू शकतात. सतत व वारंवार होणारी डोकेदुखी ही मेंदूतील ट्युमर किंवा कॅन्सरचे एक प्राथमिक लक्षण असू शकते. मात्र प्रत्येक डोकेदुखी कॅन्सरचे लक्षण नसते, पण जर डोकेदुखी वारंवार, सतत व औषध घेऊनही कमी न होत असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कॅन्सर हा आजार शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. जेव्हा पेशींच्या वाढीवर नियंत्रण राहत नाही तेव्हा ट्युमर तयार होतो आणि हळूहळू तो इतर अवयवांमध्ये पसरतो. सुरुवातीच्या काळात कॅन्सरची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि साध्या आजारासारखी दिसतात. उदा. सतत खोकला येणे, आवाज बसणे, गिळताना त्रास होणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे, वारंवार थकवा येणे, शरीरावर गाठ किंवा गाठीसारखी सूज येणे, अशा लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
महिलांमध्ये स्तनात गाठ जाणवणे, मासिक पाळीतील अनियमितता किंवा असामान्य रक्तस्राव हे सुद्धा कॅन्सरचे संकेत असू शकतात. पुरुषांमध्ये तोंडात वारंवार होणारे जखमा, तंबाखू वा गुटखा सेवनामुळे तयार होणारे पांढरे किंवा लाल डाग, वारंवार होणारी छातीत जळजळ, लघवी करताना त्रास अशी चिन्हे गंभीरतेने घ्यावी लागतात. त्यामुळे आवश्यक ती सावधानता बाळगणे, अत्यंत आवश्यक आहे.
कॅन्सरपासून बचाव करण्याचे उपाय
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनशैलीत बदल. तंबाखू, गुटखा, मद्यपान, धूम्रपान या गोष्टींना पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताण कमी ठेवणे आणि वेळेवर झोप घेणे या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. बाजारातील प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त तेलकट व फास्ट फूड टाळणे, ताजे फळे व भाज्यांचा आहारात समावेश करणे कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
कॅन्सरची लवकर ओळख पटवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे फार गरजेचे आहे. ४० वर्षांनंतर महिलांनी मॅमोग्राफी, पुरुषांनी प्रोस्टेट तपासणी, तसेच सर्वांनी रक्त तपासण्या व स्क्रिनिंग करून घ्यावे. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता खूप वाढते.
शेवटी असे म्हणता येईल की, कॅन्सर हा आजार घातक असला तरी तो टाळता येऊ शकतो आणि योग्य वेळी ओळखून उपचार घेतल्यास पूर्ण बरा होऊ शकतो. शरीरात होणाऱ्या लहानसहान बदलांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे आणि नियमित तपासणी करणे हीच कॅन्सरवर मात करण्याची खरी गुरुकिल्ली आहे.





