Pandharpur Rain : राज्यात विदर्भ वगळता पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसामुळे अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबईसह कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पवासामुळं पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, पंढरपुरात आता आषाढी वारीनिमित्त भक्ताची मोठी गर्दी होणार आहे. पण पंढपूरच्या आजूबाजूला धरणं भरली असल्यामुळं पंढपुरला पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क…
दरम्यान, सोलापूर जिलह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूरच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढल्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात जाणार आहेत. त्यामुळं आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.
उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग…
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नीरा व भीमा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळं धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीतील दोन्ही धरणांतून येणारा विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये ४० हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग राहण्याची शक्यता आहे. तर वीर धरणातून नीरा नदीपात्रात ६,५३७ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये ३१,६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. पंढरपूरच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





