Marathi News

वांगी आणि गवार 50 रुपये पाव किलो, पालेभाज्यांचे भावही गगनाला, पावसाचा सर्वसामान्यांना फटका

Written by:Smita Gangurde
Published:
ज्या जिल्ह्यात भाजीपाला होतो त्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत मुंबईपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी भाजीपाल्याचे दर जास्त आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास भाज्या येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे.
वांगी आणि गवार 50 रुपये पाव किलो, पालेभाज्यांचे भावही गगनाला, पावसाचा सर्वसामान्यांना फटका

मुंबई- पुणे आणि नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या भोजनाच्या थाळीवर झालेला आहे. पावसामुळे भाजीपाला काढण्यात येत असलेल्या अडचणींमुळे किरकोळ भाजी बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. बाजारात सर्वसामान्यपणे भाजीपाल्याच्या दरात तिप्पट ते चौपट वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबई आणि उपनगरांत पुणे, नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यांतून भाज्यांची आवक होत असते. पावसाचा जोर वाढल्यामुळे बाजारांत भाजीपाल्यांची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडल्याचं दिसतंय.

काय आहेत भाजीपाल्यांच्या किमती?

1. कोथिंबीर – 70 ते 80 रुपये मोठी जुडी
2. गवार, भेंडी – 50 रुपये पाव किलो
3. वांगी- 50 रुपये पाव किलो
4. गवार – 40 ते 50 रुपये पाव किलो
5. मेथी, पालक – 40 ते 50 रुपये जुडी
6. तोंडली – 30 ते 40 रुपये पाव किलो
7. कोबी – 30 रुपये गड्डा
8. फ्लॉवर – 40 ते 60 रुपये गड्डा
9. हिरवा वाटाणा – 50 ते 60 रुपये पाव किलो

भाज्या आणखी महागण्याची शक्यता

ज्या जिल्ह्यात भाजीपाला होतो त्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत मुंबईपेक्षा 20 ते 25 टक्क्यांनी भाजीपाल्याचे दर जास्त आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास भाज्या येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी आता कडधान्य बा पर्याय निवडल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईत कोणत्या भागातून येतो भाजीपाला?

मुंबई शहरात दादर आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक दरदिवशी होत असते. यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून तर नाशिक जिल्ह्यातून भाजीपाला आणि पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. मात्र गेल्या आठवडाभरापासून या परिसरात प्रचंड पाऊस कोसळत आहे. तर भेंडीची आवक ही सूरतहून आणि  मुरबाड परिसरातून होते. याही भागात पाऊस सुरु असल्यानं याचा  फटका  बाजारपेठेत सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय.  आषाढी एकादशी जवळ आलेली असल्यानं  बटाटे, रताळ्यांनाही सध्या बाजारात मोठी मागणी आहे. तर चातुर्मास सुरु होत असल्यानं त्यापूर्वी वांगे आणि कांदे खाण्यासाठी बाजारात जाणाऱ्या अनेक खवय्यांना भाज्यांचे दर पाहून दुसरा पर्याय निवडावा लागतोय.

Follow Us :GoogleNews