मुंबई – रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसानं राज्याला झोडपून काढलं. मुंबई शहर उपनगरांसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पर्जनवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोमवारी पावसाचा जोर पाहता मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली.
आता मंगळवारीही मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारीही शाळा, कॉलेजेसना सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं जाहीर केलाय.
मुंबईत कोणत्या शाळांना उद्या सुट्टी?
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरं परिसरातील सर्व शासकीय, खासगी, महापालिकेच्या ाशाळा, कॉलेजेसना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणानं जाहीर केलाय. सोमवारच्या सुट्टीपाठोपाठ आता मंगळवारचीही सुट्टी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना करण्यात आलंय.
📢 मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !
🌧 भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
🏫 या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेसही बंद
मुंबई महापालिकेनं घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच निर्णय ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यांत घेण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील शाळाही उद्या बंद राहणार आहेत.
कोणत्या जिल्ह्यांत शाळांना सुट्टी?
1. मुंबई
२. मुंबई उपनगरं
३. ठाणे
४. नवी मुंबई
५. कल्याण डोंबिवली
६. नांदेड
या सात जिल्ह्यांना उद्याही रेड अलर्ट
रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसानं सोमवारी दिवसभर उसंत घेतलेली नाही. या पावसाचा फचका ऑफिसात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागलाय. लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. तर रस्त्यावरील वाहतुकीचं प्रमाण वाढलं असून रस्त्यांवरही प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. मंगळवारीही पावसानं उसंत घेतली नाही तर हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
उद्या कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
हवामान विभागानं राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, नाशिक घाट या भागाचा समावेश आहे. या ठिकाणी उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यातील काही जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
हवामान विभागानं राज्यातील 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय. त्यात पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश आहे. तर अकोला, अमरावती , बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.





