Sun, Dec 28, 2025

Sugarcane Production : एकरी 400 टन उसाचे उत्पादन शक्य; अधिकाऱ्यांनी सांगितला फॉर्म्युला

Published:
ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिक उत्पादन मिळू शकते. काळे यांनी सांगितलं कि त्यांनी स्वतःच्या १३ गुंठे क्षेत्रावर हा प्रयोग केला आहे .
Sugarcane Production : एकरी 400 टन उसाचे उत्पादन शक्य; अधिकाऱ्यांनी सांगितला फॉर्म्युला

Sugarcane Production : महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात ऊस हे प्रमुख पीक आहे; २०२४-२५ हंगामात साखर उत्पादन ४७.५० लाख टनांपर्यंत पोहोचले आहे, तर २०२३-२४ मध्ये २८० लाख टन उसाचे गाळप होऊन ११०० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर हे जिल्हे ऊसपट्टा म्हणून ओळखले जातात. या भागात वर्षानोवर्षे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती करतो. हि शेती करताना प्रति एकर ६० टन, ८० टन किंवा जास्तीत जास्त १०० टन उसाचे उत्पादन होते. परंतु उसाचे उत्पादन वाढण्यासाठी सूर्यप्रकाश एक महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून एकरी ४०० मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असा दावा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी केला आहे.

सूर्यप्रकाश गरजेचा – Sugarcane Production 

शेतातील उसाला १०० टक्के सूर्यप्रकाश मिळाला तर एकरी ४०० टन उत्पादन मिळू शकतो असं सुरेश काळे यांनी सांगितलं. काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांच्या मते यासाठी प्रतिएकरी ३५ ते ४० हजार उसाची संख्या असावी, तसेच प्रत्येक उसाचे वजन २.५ ते ३ किलो असावे, जेणेकरून प्रतिएकरी १०० टन ऊस उत्पादन मिळते. यासाठी पट्टा पद्धत, ऊस रोपांचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर, वेगवेगळ्या फवारण्याचा उपयोग केल्यास एकरी १०० टन उत्पादन मिळू शकते. परंतु, असा जोपासलेला ऊस ७ ते ८ महिन्यानंतर वाऱ्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे जमीनलगत पडतो. Sugarcane Production

अधिकाऱ्यांनी स्वतः केलाय प्रयोग –

असा पडलेला ऊस जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप गरज असते. पडलेल्या उसास खूप प्रयत्न करून जिवंत राहावे लागते यामध्ये उसाची ६० टक्के ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा उसाचे वजन २ ते ३ किलोपेक्षा जास्त मिळणे खूप जिकिरीचे ठरते. हे टाळण्यासाठी स्टेजिंग करावे लागेल. एक वेळेस ऊस लागवड केल्यानंतर कमीत-कमी उसाचे पुढे ५ ते ७ खोडवे पीक घेणे शक्य आहे. उसाला एकदा स्टेजिंग केलेला खर्च पुढे १५ ते २० वर्षापर्यंत करण्याची गरज नाही. स्टेजिंग करून उसाला पडण्यापासून वाचवले आणि ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिक उत्पादन मिळू शकते. काळे यांनी सांगितलं कि त्यांनी स्वतःच्या १३ गुंठे क्षेत्रावर हा प्रयोग केला आहे .जेथे पीक घेतले ती जमीन क्षारयुक्त असून, जवळपास १३०० टीडीएस असणारे पाणी अशा क्षेत्रांमध्ये स्टेजिंग पद्धत वापरून ८६०३२ या जातीच्या उसाची लागवड केली. जवळपास एकरी ४०० टन उसाचे उत्पादन मिळू शकते, असे मत काळे यांनी व्यक्त केले.