Cold Wave: महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा 9 °C वर घसरला; थंडीच्या लाटेमुळे आरोग्याला धोका वाढला !

Written by:Rohit Shinde
Published:
उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे वेगाने झेपावत असल्याने राज्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे.
Cold Wave: महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा 9 °C वर घसरला; थंडीच्या लाटेमुळे आरोग्याला धोका वाढला !

यंदाचा पावसाळा देखील विक्रमी अशा स्वरूपाचा राहिला, त्यानंतर यंदाची थंडी देखील काही विक्रम प्रस्थापित करते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे वेगाने झेपावत असल्याने राज्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा 9 °C वर घसरला आहे. ही थंडी शेतीसाठी फायदेशीर असली तरी नागरिकांना मात्र या काळात आरोग्याचा धोका संभवू शकतो.

तापमानाचा पारा 9 °C वर घसरला!

सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे राज्यातील निचांकी 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शुक्रवारी 31.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमानात अंशत: वाढ होऊन पारा 32 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 16 अंशापर्यंत राहील.  उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 11 अंशांच्या खाली आल्याने राज्यात गारठा वाढला आहे, तसेच आज शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. थंडीच्या कडाक्यासोबतच अनेक ठिकाणी कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.

राज्यात सध्या सकाळी हुडहुडी आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अशी परस्परविरोधी स्थिती कायम आहे. दुपारचे तापमान तिशीपार असलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि ती राज्यातील सर्वाधिक होती. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे राज्यातील नीचांकी 9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

आरोग्याची योग्य काळजी घ्या !

हिवाळ्यातील थंडीची लाट महाराष्ट्रात तीव्र होत असून तापमान झपाट्याने घटत आहे. अशा वातावरणात सर्दी, खोकला, दमा, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासूनच आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान कमी झाल्यास हायपोथर्मियाचा धोका वाढतो. त्यामुळे उबदार कपडे, मोजे, टोपी वापरणे, गरम पाणी पिणे, संतुलित आणि गरम आहार घेणे महत्त्वाचे आहे. थंडीपासून संरक्षणासाठी घरातील वायुवीजन योग्य ठेवावे आणि बाहेर जाताना पूर्ण अंग झाकलेले असावे. योग्य काळजी घेतल्यास थंडीच्या लाटेतही आरोग्य सुरक्षित राहू शकते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews