Marathi News

सायन उड्डाणपुलाची सर्व कामे 15 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होणार, मुंबई महापालिकेची माहिती

Written by:Smita Gangurde
Published:
याच पद्धतीने महानगरपालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे आदेश दिलेत.
सायन उड्डाणपुलाची सर्व कामे 15 जुलै 2026 पर्यंत पूर्ण होणार, मुंबई महापालिकेची माहिती

मुंबई- शीव (सायन) उड्डाणपुलाच्या कामांना अपेक्षित गती प्राप्त होत आहे. पादचा-यांना पूर्व – पश्चिम आवागमनासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्‍यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भुयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्‍या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्‍यात येईल. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आलीय.

याच पद्धतीने महानगरपालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतरपद्धतीने करावीत. प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे. यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे आदेश दिलेत.

अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत शीव उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असं देखील मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय. शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.

कामाचे चार टप्पे

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्ह‍णाले की, शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम , दोन पादचारी भुयारी मार्गाचे काम मुंबई महानगरपालिका करत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्‍यानंतर रेल्‍वे पुलाच्‍या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्‍ध व्‍हावा, असे नियोजन करण्यात येतंय.

Follow Us :GoogleNews