Juices for a glowing face: अलीकडे सर्वांनाच निरोगी शरीर आणि चमकदार त्वचा हवी असते. परंतु नोकरी, करिअर, शिक्षण, इतर अनेक कारणांमुळे स्वतःकडे फारसं लक्ष द्यायला जमत नाही. दुसरीकडे अनेकजण चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी महागड्या प्रॉडक्टसची मदत घेतात. परंतु त्यामुळे अनेकदा त्वचेवर दुष्परिणाम होतात. शिवाय ते खर्चिकसुद्धा असते.
परंतु तुम्ही घरच्या-घरी अगदी नैसर्गिकरित्या सुंदर, चमकदार त्वचा सहजपणे मिळवू शकता. चेहरा चमकदार बनवण्यासाठी त्याला बाह्य गरजेसोबतच अंतर्गत मदत हवी असते. अर्थातच तुम्ही काय-काय खातापिता हे अतिशय महत्वाचे असते. या गोष्टी त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. आज आपण असे काही ज्यूस पाहणार आहोत जे त्वचेला आतून निरोगी बनवून त्वचेवर चमक आणतात. चला पाहूया हे ज्यूस नेमके कोणते आहेत….
गाजर आणि संत्र्याचा ज्यूस-
गाजर आणि संत्र्याचा रस चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. गाजर बीटा कॅरोटीनने समृद्ध असते. ते खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे चेहऱ्याची गुणवत्ता सुधारते. संत्री व्हिटॅमिन सी ने समृद्ध असते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येण्यास मदत होते. त्यामुळे गाजर आणि संत्र्याचा रस दररोज सेवन करा.
टोमॅटो आणि कोथिंबीरचा ज्यूस-
टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे संयुग असते. जे त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यास मदत करते. तसेच त्वचेवर सुरुकुत्या येण्याची समस्या दूर होते आणि त्वचेचा रंग सुधारतो. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन्स सी असते. त्यामुळे टोमॅटी आणि कोथिंबीरच्या ज्यूस पिल्याने शरीर आतून डिटॉक्सीफाय होते आणि त्वचेवर नैसर्गीक चमक येते.
काकडी, पुदिना आणि लिंबू-
काकडी, पुदिना आणि लिंबू हे तिन्ही पदार्थ शरीराला आतून स्वच्छ करतात. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या दूर होऊन गुणवत्ता सुधारते. या तिन्ही पदार्थांचा ज्यूस पिल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.
बीट, डाळिंब आणि सफरचंद ज्यूस-
बीट, डाळिंब आणि सफरचंद हे तिन्ही पदार्थ रक्त शुद्ध करण्यास आणि रक्त वाढविण्यास मदत करतात. त्यातील अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म चेहऱ्यावरील सूज, पिंपल्स दूर करून चेहरा साफ करतात. तसेच त्यातील अँटी ऑक्सीडेन्ट त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवून चेहऱ्यावर चमक आणतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





