या वर्षी भारत १५ ऑगस्ट रोजी आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीयांनी ब्रिटिशांच्या राजवटीतून सुटकेचा श्वास घेतला. विविधतेने नटलेल्या या देशातील नागरिक एकजुटीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. स्वातंत्र्यदिन हा केवळ एक उत्सव नसून, भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून १२ व्यांदा देशाला संबोधित करणार आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा, सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांना आदराने स्मरण केले जाते आणि ध्वजारोहण केले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी भाषणे आयोजित केली जातात. देशभरातील विविध शाळांमध्ये भाषण स्पर्धा ठेवल्या जातात. त्यामुळे १५ ऑगस्टला भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पुढील माहिती महत्त्वाची आहे.

नमस्कार,

उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,

आज आपल्याला अभिमानाने सांगता येतंय की आपण आपल्या देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्या देशाने ब्रिटिश सत्तेपासून मुक्त होऊन स्वातंत्र्य मिळवलं. तो दिवस फक्त एक तारीख नाही, तर शेकडो वर्षांच्या संघर्षाचा, बलिदानाचा आणि स्वप्नांचा विजय आहे.

आपण आज ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो, ते सहज मिळालेले नाही. भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण पणाला लावले, त्यांची इच्छा होती की भारत हा स्वाभिमानी, स्वावलंबी आणि सशक्त राष्ट्र बनावा.

आज, आपल्या देशाने विविध क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. विज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. ‘विकसित भारत 2047’ हे स्वप्न आता केवळ संकल्प राहिलं नाही, तर ते कार्यक्रमात रूपांतरित झालं आहे.

पण या प्रगतीसोबतच आपली जबाबदारीही वाढली आहे. आपलं संविधान, आपली संस्कृती आणि आपली एकता ही आपली खरी ताकद आहे. भविष्यातील भारत आपल्याच हातात आहे. आपण जर प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील राहिलो, तर भारताचं भविष्य निश्चितच उज्वल असेल.

आजच्या या दिवसानिमित्त, आपण केवळ झेंडा फडकवून थांबू नये, तर देशासाठी काही करण्याची प्रतिज्ञा घेऊया. आपल्या परिसरात स्वच्छता राखणे, शिक्षणासाठी प्रयत्न करणे, पर्यावरण जपणे आणि सामाजिक सौहार्द जपणे ही देखील देशसेवाच आहे.

शेवटी, मी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘जय हिंद, जय भारत’ असा जयघोष करतो.

धन्यवाद आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!