अवघ्या १० वर्षांचा लहानगा आई-वडिलांकडे पॉकेट मनीची मागणी करतो, कारण त्याच्या वर्गातल्या मित्रांना त्यांचे पालक तसे पैसे देत असतात. मध्यमवर्गीय कुटुंबातील आई- वडिलांना धक्का देणारा हा प्रसंग आहे. अशा वेळी या लहानग्यांना पैसे द्यायचे की नाहीत, असा प्रश्न स्वाभाविकपणे पालकांना पडतो. कारण या पालकांच्या लहान वयात त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या गरजा भागवल्या असल्या तरी असे पॉकेट मनी त्यांना कधीही मिळालेले नाहीत.
अशा वेळी पैसे दिले तर लहान मुलगा बिघडण्याची शक्यता आणि दुसरीकडे दिले नाही तर त्या लहानग्याच्या मनात आई-वडिलांविषयी निर्माण होणारी कटुता. यात मुलांना लहान वयात पैशांचं व्यवस्थापन जमायला हवं, असंही एका बाजूला पालकांना वाटत असतं, अशा स्थितीत नेमकं करायचं तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडतो.
मुलांना पॉकेट मनीची खरंच गरज आहे का?
पालकांच्या याच प्रश्नाचं उत्तरांबाबत मनसोपचारतज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी मुलांना खरंच याची गरज आहे का, असा प्रतिप्रश्न केलाय. पॉकेटमनी मागणमारा मुलगा 10 वर्षांचा असेल तर तो पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतो. त्याच्या जगण्यात त्याला लागणाऱ्या सगळ्या बाबी पालकांकडून पूर्ण केल्या जातात. त्याची शाळेत नेण्या-आणण्याची व्यवस्था, त्याचा दुपारचा जेवणाचा डबा, बाहेर फिरणं, हॉटेलमध्ये जेवणं या सगळ्या बाबी पालक पूर्ण करतात. यात त्या लहानग्याला त्याच्या खिशातून एकही पैसा खर्च करण्याची गरजच नाही. अशा स्थितीत त्याला वेगळा पॉकेट मनी देण्याची गरज नाही, असं स्पष्ट मत काही मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
पॉकेटमनीची मागणी कशी हाताळाल?
जर मुलाचे इतर मित्र शाळेत पॉकेट मनी आणत असतील आणि त्यानं घरात अशी मागणी केली तर त्याला एकदम रागावणंही चुकीचं आहे. याऐवजी त्याच्याशी संवाद साधायला हवा, असंही मानसोपचारतज्ज्ञ सांगतायेत. प्रत्येक कुटुंबाचे नियम, आर्थिक स्थिती ही वेगवेगळी असते, याची जाणीव मुलाला करुन दिली आणि त्याच्या सर्व गरजा पालक भागवतात हे त्याला शांतपणे लक्षात आणून दिलं, तर त्याच्या मनात पालकांबाबत कटुता निर्माण होणार नाही.
मुलांशी संवाद साधण्याची गरज
त्यानं पैसे मागितले तर त्याचं कारण त्याला विचारायला हवं, त्या कारणाबाबत त्याच्याशी चर्चा करता येऊ शकते. खरंच ज्या वस्तूसाठी पैशांची मागणी होतेय, ती वस्तू आत्ताच गरजेची आहे का, याची पडताळणी आणि सवय त्या मुलालाही लागायला हवी. वस्तू खरोखरीच गरजेची असेल तर ती पालकांनी त्याला घेऊन द्यावी पण केवळ दिखाव्यासाठी किंवा हट्टासाठी आग्रह असेल तर त्याला जागीच नकार द्यायला हवा. मुलाला ओरडण्यापेक्षा त्याच्याशी संवाद साधून घरातील आर्थिक स्थितीची जाणीव करुन त्याला जर नकार दिला तर त्यालाही ते लक्षात आल्याशिवाय राहणार नाही





