How many times a day should you apply sunscreen: अलीकडे सनस्क्रीन वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोक सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीनमुळे काळे डाग आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे टाळण्यास देखील मदत होते.
काही तज्ज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशात जाण्याच्या ३० मिनिटे आधी तुम्ही सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन त्वचेत शोषून घेण्यासाठी काही वेळ लागतो. जर तुम्ही सनस्क्रीन लावला आणि लगेच उन्हात गेलात तर त्याचा परिणाम फारसा दिसून येत नाही. अनेकांना असा प्रश्न पडतो की, दिवसातून किती वेळा सनस्क्रीन लावावे. आज आपण याबाबतच जाणून घेऊया.
दिवसभरात कितीवेळा सनस्क्रीन लावावे-
दररोज सकाळी क्रिम किंवा लोशन लावल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावावे. तुम्ही बाहेर जात नसलात तरीही तुमच्या त्वचेला सनस्क्रीनची आवश्यकता असते. एकदा सनस्क्रीन लावून तुम्ही दिवसभर सूर्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे घरी दिवसातून २ ते ३ वेळा लावावे. तुम्ही फील्डवर्क करत असाल तर तुम्ही दर दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावणे गरजेचे आहे.
सनस्क्रीन कुठे लावावे?
तज्ज्ञांच्या मते तुम्ही हात, पाय, अंडरआर्म्स, मान, कानामागील भाग, पापण्या, चेहरा आणि पोट अशा भागांवर सनस्क्रीन लावावे. परंतु, चेहऱ्यासाठी सनस्क्रीन शरीराच्या सनस्क्रीनपेक्षा वेगळे असते. चेहऱ्यासाठी असे सनस्क्रीन निवडा ज्यामुळे पिंपल्स येणार नाहीत. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर सनस्क्रीन निवडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सनस्क्रीनपूर्वी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे का?
सनस्क्रीनपूर्वी मॉइश्चरायझर लावणे अनेक कारणांमुळे फायदेशीर ठरू शकते. पहिले म्हणजे, मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवते आणि सनस्क्रीन समान रीतीने पसरण्यास मदत करते. मॉइश्चरायझर न वापरल्याने त्वचेची जळजळ किंवा कोरडेपणा येऊ शकतो, विशेषतः कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी. कोरड्या त्वचेवर थेट सनस्क्रीन लावल्याने ते लावणे कठीण जाते. ज्यामुळे काही भाग सूर्याच्या किरणांच्या संपर्कात राहतात.
काही सनस्क्रीनमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा तेलकट किंवा सामान्य असेल, तर तुम्ही मॉइश्चरायझरशिवाय सनस्क्रीन वापरू शकता. जर ती मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन असेल तर पुन्हा मॉइश्चरायझरची गरज नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





