सोशल मीडियाच्या दररोज नवनवे चेहरे व्हायरल होत असतात. सध्या असा एक चेहरा समोर आलाय ज्याने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्यांचं नाव आहे ‘सीमा आनंद’. सीमा आनंद या गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत. विशेषतः ‘जेन-झी’ (Gen-Z) म्हणजेच आजची तरुण पिढी त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी एआयचा वापर करीत त्यांचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. त्यामुळे त्या प्रचंड दुखावल्या होत्या. त्यांनी याबाबत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकारामुळे त्यांच्याबद्दल अधिक सर्च केलं जात आहे.
कोण आहेत सीमा आनंद?
सीमा आनंद या एक प्रसिद्ध लेखिका, ‘स्टोरीटेलर’ आणि कामसूत्र तज्ज्ञ आहेत. त्या प्रामुख्याने लैंगिक आरोग्य, नातेसंबंध आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमधील वैवाहिक जीवनाबद्दल (ज्या गोष्टी सर्वसामान्यांना फारशा माहीत नसतात) सांगतात. त्यांचं वय ६३ वर्षे आहे. किचकट किंवा समाजात चर्चेसाठी निषिद्ध मानले जाणारे विषय त्या अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत सांगतात. त्यामुळे त्यांनी जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जेनझींना त्यांच्याबद्दल उत्सुकता का वाटतेय?
आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक काळात तरुण पिढीला लैंगिक आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत अनेक शंका असतात. सीमा आनंद या विषयांवरील सामाजिक संकोच दूर करण्याचे काम करतात. त्यांची बोलण्याची शैली, पेहराव (विशेषतः त्यांच्या सुंदर साड्या आणि दागिने) आणि विषयाची मांडणी यामुळे तरुण पिढीला त्या खूप प्रभावी वाटतात.
View this post on Instagram
विक्रमी सर्च
अनेकदा बॉलीवूड सेलिब्रिटी किंवा क्रिकेटपटू गुगलवर टॉपवर असतात. मात्र, एका ‘कंटेंट क्रिएटर’ने आणि अभ्यासकाने या सर्वांना मागे टाकणे ही मोठी गोष्ट मानली जात आहे. भारतीय संस्कृतीतील प्राचीन ज्ञान आणि आधुनिक काळातील गरजा यांची सांगड त्या ज्या प्रकारे घालतात, त्यामुळेच त्या ‘मोस्ट सर्चड इंडियन’ ठरल्या आहेत.





