पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे जवळपास 2,000 रू. जमा झाले आहेत.

90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000/- जमा

खरंतर महाराष्ट्रात या योजनेचा मोठा लाभार्थी वर्ग असून, एकूण 90,41,241 पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1 हजार 808 कोटी 25 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग तसेच बँकिंग यंत्रणेने समन्वय राखत हप्त्याचे वितरण वेळेवर पार पाडण्यासाठी मोठे सहकार्य केले. तसेच, शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल आणि मोबाइल अॅपद्वारे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर हे पैसे अद्याप आले नसतील, तर सरकारचे अधिकृत पोर्टल आणि इतर साधनांचा वापर करून तुम्ही याबाबत चौकशी करू शकता.

2019 पासून योजना सुरू, शेतकऱ्यांना लाभ

पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता रब्बी हंगामाच्या निमित्तानं 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6  हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्त्यांचे 2000 रुपयांप्रमाणं पैसे देण्यात आले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीच्या 21 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागून होते. त्यानंतर आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21 व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. योजनेतील सातत्य लक्षात घेता शेतकऱ्यांना आगामी 22 वा हप्ता देखील वेळेत मिळेलच, अशी आशा व्यक्त केली जात आहे.