परीक्षा परिषदेकडून रविवारी २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहावे, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या पहिल्या पेपरला नऊ वाजता, तर दुपारी अडीच वाजता सुरू होणाऱ्या पेपर भाग दोनसाठी उमेदवारांनी दुपारी एक वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षेनंतर पुढील ४५ दिवसात टीईटीचा निकाल जाहीर केला.
आधार पडताळणी अनिवार्य; डिजिलॉकर सुविधा
राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसह म्हणजेच टीईटी सर्वच परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडूनआधार पडताळणी, उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय टीईटी वर्षातून दोन वेळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, टीईटी, टेट अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची ‘यूआयडीएआय’ कडून पडताळणी केली जाणार आहे. तसेच वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे. टीईटी प्रमाणपत्र गहाळ झाल्यानंतर उमेदवारांना अडचणी येतात. त्यामुळे डिजिलॉकरचा पर्याय उपलब्ध असल्यास उमेदवारांची समस्या दूर होणार असल्याने ही सुविधाही लवकरच दिली जाईल.
टीईटी परीक्षेत मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. मराठीसाठी तीन लाख २७ हजार १३५, इंग्लिशमधून २८ हजार ४३७, उर्दू २५ हजार ९३५, हिंदी ९२ हजार ४२०, बंगाली माध्यमातून १६८, कन्नड १४६८, तेलगू ३०, गुजराथी ७५ आणि सिंधी माध्यमातून केवळ एका उमेदवाराने नोंदणी केली आहे. तसेच राज्यातून ५२८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. अशी माहिती देखील समोर येत आहे.





