हिवाळ्यात हवा प्रदूषणात लक्षणीय वाढ होते आणि त्याचा थेट परिणाम म्हणून AQI सतत घसरत जातो. थंड हवेमुळे वातावरणातील हवेचा वेग कमी होतो, त्यामुळे धूर, धूळ आणि प्रदूषक कण जमिनीच्या जवळच अडकून राहतात. यामुळे स्मॉगची स्थिती निर्माण होते आणि श्वसनासंबंधी आजारांची शक्यता वाढते. वाहनांचे धूर, औद्योगिक उत्सर्जन, कचरा जाळणे आणि बांधकामातील धूळ हिवाळ्यात विशेषतः जास्त प्रमाणात हवेच्या गुणवत्तेला हानी पोहोचवतात. मुंबई शहर आणि परिसरात सध्या खरंतर अशीच काहीशी स्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबईतील AQI धोकादायक पातळीवर
मुंबईकरांना सध्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आता मुंबईत प्रदूषणही वाढले आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना दुहेरी हवामान संकटाचा सामना करावा लागत आहे. सध्या मुंबई शहरात सर्वत्र धूरकट वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक AQI १७६ वर पोहोचला आहे. याचा अर्थ सध्या मुंबईतील हवा असमाधानकारक आहे. अनेक उपनगरांमध्ये हा आकडा २०० च्याही पुढे गेला आहे, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होताना दिसत आहेत. बांधकाम, वाहनांचा धूर आणि कमी वाऱ्यामुळे प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहिले आहेत. वाढलेले प्रदूषण आणि हवेतील गारठा यामुळे श्वसनाचे त्रास असलेल्या लोकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. एकीकडे प्रदूषणाची समस्या असताना, दुसरीकडे मुंबईत गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री किमान तापमान सुमारे २१ अंश सेल्सियस नोंदवण्यात येत आहे. हे तापमान सध्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा तब्बल पाच अंशांनी कमी आहे.
मुंबईकरांनो, आरोग्याची काळजी घ्या !
हवा प्रदूषण वाढल्यावर श्वसन विकार आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घेणे अनिवार्य ठरते. प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जाऊन श्वास लागणे, खोकला वाढणे, दमा तीव्र होणे अशी लक्षणे निर्माण करू शकतात, तर हृदयाच्या रुग्णांमध्ये छातीत दडपण, धडधडीची वाढ आणि रक्तदाबातील बदल दिसू शकतात. अशा परिस्थितीत सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जाणे शक्यतो टाळावे, तसेच बाहेर जाताना N95 मास्कचा वापर करावा. घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास एअर प्युरीफायरचा वापर करावा. शरीरातील ओलावा टिकवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आणि गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त ठरते. औषधे वेळेवर घेणे आणि कोणतीही लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.





