सावधान! ऐन दिवाळीत राज्यात दुध भेसळीचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी कोण खेळतंय?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रासह देशभरातील दुध भेसळीचा प्रश्न हा गंभीर अशा स्वरूपाचाच आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत धुळ्याच्या शिरपुरमधील व्हायरल व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
सावधान! ऐन दिवाळीत राज्यात दुध भेसळीचा कहर; नागरिकांच्या आरोग्याशी कोण खेळतंय?

महाराष्ट्रातील दूध भेसळीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शुद्ध दुधात पाणी, साबण, युरिया, स्टार्च, आणि डिटर्जंट यांसारखे हानिकारक घटक मिसळले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. ग्रामीण भागापासून शहरी बाजारपेठांपर्यंत या भेसळीचे प्रमाण वाढले असून अन्नसुरक्षा विभागाला अनेक ठिकाणी कारवाई करावी लागत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे भेसळखोर अधिक सक्रिय होतात.

त्यामुळे ग्राहकांनी दूध विकत घेताना जागरूक राहणे आणि प्रमाणित दुध ब्रँडची निवड करणे आवश्यक आहे. या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासन, उत्पादक आणि ग्राहक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत धुळ्याच्या शिरपुरमधील एका व्हायरल व्हिडिओने पुन्हा एकदा राज्यातील दुध भेसळीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शिरपुरच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा

शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून एका महिलेने दूध खरेदी केले होते. काही तासांनंतर हे दूध खराब झाले. संशय आल्याने महिलेने दूध उकळून पाहिले असता ते अक्षरशः रबरासारखे जाड आणि चिकट झाले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तिने मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तत्काळ हालचाल सुरू करण्यात आली. विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की, “संबंधित दूध विक्री केंद्रावरून नमुने घेतले जाणार आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी ते पाठवले जातील. तपास अहवाल आल्यानंतर दोषी दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती दिली आहे. हा फक्त एका गावापुरता मर्यादीत प्रश्न नसून ही अवघ्या देशासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे.

भेसळयुक्त दुधाचा राज्यात गंभीर प्रश्न

भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. दुधात मिसळले जाणारे रासायनिक पदार्थ जसे की युरिया, डिटर्जंट, स्टार्च, साबण आणि कृत्रिम फॅट्स शरीरासाठी अत्यंत घातक ठरतात. अशा दुधाचे सेवन केल्यास पचनसंस्थेचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे नुकसान आणि त्वचेचे रोग होऊ शकतात. लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी हे दूध अधिक धोकादायक ठरते. शुद्ध आणि पोषक आहाराच्या नावाखाली नागरिकांना विषारी पदार्थांचा डोस मिळत असल्याने ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. म्हणूनच दुधाची गुणवत्ता तपासणे आणि प्रमाणित दुध विक्रेत्यांकडूनच खरेदी करणे आवश्यक आहे.