महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत मागील आठवड्यात राज्यातील तापमानात मोठी घट झाली होती. काही ठिकाणी पारा ९ अंशांच्या खाली पोहोचला होता. मागील दोन दिवसांपासून जोर काहीसा कमी झाला असून किमान तापमान १२ ते १३ अंशांच्या आसपास जाणवते. मात्र पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
हवामानात बदल; पण, थंडीचा जोर पुन्हा वाढणार !
आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील.
थंडीचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात २.२ अंश सेल्सियसने वाढ तर किमान तापमानात १.७ अंश सेल्सियसने घट झाली आहे. सध्याची ही स्थिती तात्पुरती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. वादळी हवामान स्थिर झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल.






