यंदा दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळणार नाही? सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा

Written by:Rohit Shinde
Published:
शिवभोजन थाळी योजना बंद पडलेली असताना सरकारकडून अद्याप 'आनंदाचा शिधा'बाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार की नाही? असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
यंदा दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळणार नाही? सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची चर्चा

लाडकी बहीण योजनेवर सरकार अलीकडच्या काळात मोठा निधी खर्च करत आहे. यामुळे अनेक विभागांचा निधी वळवला गेला, किंवा काही योजनांना निधीचा पुरवठा बंद झाला अशा घटना घडल्या आहेत. अनुदाना विना शिवभोजन थाळी योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना आता दिवाळीच्या आनंदाच्या शिध्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळणार की नाही असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.

आनंदाचा शिधा मिळणार की नाही?

राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा ही योजना सुरु केली होती. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत दिला जायचा. मात्र त्याचं वितरण झालं नाही. 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसंच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने आनंदाचा शिधा किटचं वितरण केलं होतं. मात्र, यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

दिवाळी अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपली असताना सरकारी पातळीवर कोणत्याही हालचाली सुरु नसल्याने यंदा या भागांमध्येही ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक लोकप्रिय योजना आणि घोषणांचा सपाटा लावला होता. त्यानंतर मात्र अनेक योजनांना ब्रेक लागल्याचे चित्र सध्या राज्यामध्ये आहे.

शिवभोजन थाळी बंद होणार?

गरिबांना, कामगारांना, विद्यार्थ्यांना आणि वयोवृद्धांना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी योजना’ सध्या मोठ्या संकटात आहे. कारण, या थाळीसाठी केंद्रांना मिळणारे अनुदान तब्बल चार महिन्यांपासून थकले असल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिवभोजन थाळी म्हणजे केवळ एक जेवणाची सोय नव्हे, तर अनेक कुटुंबांचा जगण्याचा आधार आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी मिळावा म्हणून, शिवभोजन थाळीसाठीचं अनुदान रोखलं गेलं आहे. म्हणजे एका योजनेला गती देताना दुसऱ्या योजनेची गळचेपी सुरू आहे. अशा स्वरूपाची चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू असल्याचे चित्र आहे.