राज्यभरात सध्या एका बैलाची मोठी चर्चा आहे. या बैलाचं नाव ‘बिजल्या’ असून हा चक्क ११ लाखांना विकला गेला आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड याने ११ लाखांना बैल विकला आहे. पवन राठोड या शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाची चांगली काळजी घेतली, त्याचं पालन-पोषण केलं आणि त्याला उत्तम प्रकारे प्रशिक्षित केलं. त्यानंतर तो ‘बिजल्या’ म्हणून जिल्ह्यात ओळखला जाऊ लागला. या बिजल्या बैलाची अनेक वैशिष्ट्ये आहेत, शिवाय हा बैल इतर बैलांच्या तुलनेने बराच वेगळा ठरतो, नेमकी या बैलाची वैशिष्ट्ये काय? खासियत काय ? त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

‘बिजल्या’ची 11 लाखांना विक्री, शेतकरी मालामाल

जालना जिल्ह्यातील कानफोडी तांडा येथील पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल 11 लाख 11 हजारांना विकला गेला आहे, ज्यामुळे ते लखपती झाले आहेत. सांगलीच्या सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला. घोड्यासोबत धावणारा आणि बिजल्याचा खास खुराक आहे. त्याचीच सध्या गावागावात चर्चा रंगली आहे. कानफोडी तांडा येथील बिजल्या बैल खूप प्रसिद्ध आहे. वेगाने धावून घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख आहे. शंकर पटातला बैल असल्यानं त्याला जास्त किंमत मिळाली.

शर्यतीत घोड्याला घाम फोडणारा बिजल्या, खुराक खास…

केवळ 10 महिन्यांचा असताना या बैलाला केवळ 51 हजार रुपयात तामिळनाडूतून खरेदी केले होते. घोड्यालाही घाम फोडवणारी ताकद असल्याचे बोलले जात होते. बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. त्याची उंची, ताकद आणि तालमेळ पाहून त्याला उच्च किंमत दिली जात होती. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला. या विक्रीमुळे पवन राठोड यांचे आर्थिक जीवनच बदलले असून, ते एका दिवसात लखपती झाले आहेत. आतापर्यंत या बैलाने 30 शर्यतीत सहभाग नोंदवला. यापैकी 25 शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. जालना, जिंतूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शर्यतीत त्याने बाजी मारली आहे.

15 महिन्यांत त्याला आहारात रोज 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, सायंकाळी मका आणि गहू भरडा दिला जातो. दर दोन दिवसांनी त्याची गरम पाण्याने अंघोळ घालून निगा राखली जाते. बिजल्याने 30 पैकी 25 शर्यती जिंकल्या. शंकरपटात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिले स्थान पटकावले. जालना, वाशिम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील 30 पैकी 25 शर्यतींमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून 3 ते 4 लाख रुपये कमाई केली आहे.