दिवाळी सणात फटाक्यांची आतषबाजी ही आनंद आणि उत्सवाचे प्रतीक मानली जाते, परंतु तिच्यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही होते. फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषणामुळे वातावरणातील हवा दूषित होते, ज्याचा परिणाम श्वसनाच्या आजारांवर आणि पर्यावरणावर होतो. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि प्राण्यांसाठी हा धूर आणि आवाज हानिकारक ठरतो. अशा या परिस्थितीत सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी गावात मात्र एकही फोडला जात नाही. त्याचे कारण धक्का देणारे आहे. अधिक सविस्तर जाणून घेऊ…
11 वर्षांपासून फटाके फोडणे बंद!
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावात जेमतेम 65 कुटुंबातील 380 लोकसंख्या असलेल्या गावात फटाके न फोडता दिवाळी साजरा केली जाते. चिंचणी या गावात फटाके मुक्त दिवाळी साजरा केली जाते. गावातील लहान चिमुकले किल्ले बनवून, विविध प्रकारचे खेळ खेळत दिवाळी साजरा करतात. गेल्या 11 वर्षापासून या गावात दिवाळी हा सण फटाके मुक्त सण साजरा केला जातो. चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. तेव्हापासून आजवर या गावात दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत.
11 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं ?
यामागील कारण देखील तितकच रंजक आहे. फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने शेतात जाऊन कुत्रा मरण पावला होता. तेव्हा चिंचणी गावातील गावकऱ्यांनी एक बैठक घेतली व गावात इथून पुढे दिवाळी असो किंवा कोणताही सण असो कोणत्याही प्रकारचे फटाके फोडायचं नाही. मात्र तेव्हापासून चिंचणी गावात पाळली जाणारी ही परंपरा नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.
फटाक्यांमुळे पर्यावरणाचे नुकसान
फटाक्यांमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. फटाके फोडल्यामुळे हवेत कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि इतर घातक वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हवेचे प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचते. या धुरामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे त्रास वाढतात. आवाजाच्या प्रदूषणामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच, फटाक्यांमध्ये वापरले जाणारे रासायनिक घटक माती आणि पाण्यालाही दूषित करतात.





