Marathi News

Cold Wave: महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरू; अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात पहाटे धुक्याची चादर पसरत असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामा विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Cold Wave: महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरू; अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट

काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेच्या थंड वाऱ्यांचा प्रवाह सुरु असल्याने राज्यात दिवसागणिक थंडीची लाट येत आहे. राज्यात पहाटे धुक्याची चादर पसरत असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामा विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आणखीन हुडहुडी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सावधगिरीचा इशारा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला असून कमाल तापमानात घट होत आहे. तर पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकत आहे.

उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा गारठला !

राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असून, उत्तर महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यात देखील थंडीची लाट कायम आहे. 17 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांना थंड लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्याला शीतलहरीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशतः काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके राहील.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड अशा एकूण सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून याकाळात थंडीच्या लाटीचा इशारा पुढील 24 तासांसाठी देण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळच्या वेळेत थंडीचा जोर अधिक वाढला आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या पारा खूप खाली घसरू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच  जिल्ह्यांत तापमानात मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे. शेतीला या थंडीचा चांगला फायदा होताना दिसत आहे. तर नागरिकांना मात्र हुडहुडी भरली असून ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आरोग्याची योग्य काळजी घ्या !

हिवाळ्यातील थंडीची लाट महाराष्ट्रात तीव्र होत असून तापमान झपाट्याने घटत आहे. अशा वातावरणात सर्दी, खोकला, दमा, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासूनच आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराचे तापमान कमी झाल्यास हायपोथर्मियाचा धोका वाढतो. त्यामुळे उबदार कपडे, मोजे, टोपी वापरणे, गरम पाणी पिणे, संतुलित आणि गरम आहार घेणे महत्त्वाचे आहे. थंडीपासून संरक्षणासाठी घरातील वायुवीजन योग्य ठेवावे आणि बाहेर जाताना पूर्ण अंग झाकलेले असावे. योग्य काळजी घेतल्यास थंडीच्या लाटेतही आरोग्य सुरक्षित राहू शकते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews