देशातील उत्तर भारतातील हवामान सध्या थंड आहे. तर दक्षिणेकडील काही राज्यांत जसे की केरळ, तामिळनाडू या भागात काही ठिकाणी पावसाची स्थिती आहे. त्यामुळे वातावरणात कमालीची तफावत सध्या दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेसह पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तासात देशातील अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या भागात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळमध्ये पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात देखील मोठा अलर्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. थंडीच्या लाटेचा मोठा इशारा राज्यात देण्यात आला असून थंडीची लाट येणार असून थंडीचा कडाका अजून वाढणार आहे.
महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका
महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीचा शेती आणि पशुधनावर लक्षणीय परिणाम होतो. परिणामी, आयएमडीच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिके आणि पशुधनाची काळजी आणि संरक्षण याबाबत सल्ला दिला आहे. त्यानुसार, तापमानात घट होण्याचा शेतावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी संध्याकाळी हलके पाणी द्या. भाजीपाला रोपवाटिका आणि छोट्या रोपांना पॉलिथिन किंवा मल्चिंगने झाकून ठेवा. केळीच्या घडांना 6% छिद्रित पॉलीबॅग्जने झाकून थंडीपासून वाचवा. असं सांगण्यात आले आहे.
कडक थंडीमध्ये दूध देणाऱ्या जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंडीचा विशेषतः गायी-म्हशींच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाय नक्की करावेत. गोठ्यात थंडी वारा शिरणार नाही याची काळजी घ्या. शक्य असल्यास प्लास्टिकचे पडदे, ताडपत्री लावा. जमिनीवर कोरडे गवत, भूसा किंवा चटई ठेवा जेणेकरून जनावरांना गारवा जाणार नाही. गोठा नियमित साफ ठेवा. ओलसरपणा आजार वाढवतो. अतिथंड पाणी जनावरांच्या पचनावर परिणाम करते. शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी द्या. यामुळे दूध उत्पादनही स्थिर राहते.
हृदयविकाराचा धोका वाढला; काळजी घ्या !
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.
थंड हवेत अचानक बाहेर जाणे टाळावे आणि गरम कपड्यांचा योग्य वापर करावा. हलका व्यायाम नियमितपणे करावा, परंतु अत्यंत थंडीत जड व्यायाम टाळावा. आहारात गरम, हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. भरपूर पाणी पिऊन शरीरातील ओलावा टिकवणेही महत्त्वाचे आहे. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या सवयी थंडीत अधिक धोकादायक ठरतात, त्यामुळे त्यापासून दूर राहणे उत्तम. थंडीच्या दिवसांत छातीतील वेदना, श्वास घेण्यात अडचण, थकवा किंवा अस्वस्थता जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.






