Weather Update: महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरली; थंडीने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा !

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील थंडीची लाट सध्या काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे.
Weather Update: महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरली; थंडीने वैतागलेल्या नागरिकांना दिलासा !

राज्यातील थंडीबाबत आता हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे. 16 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला असून गेल्या आठवड्यातील कडाक्याच्या थंडीचा जोर आता कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार थंड वाऱ्यांचा प्रभाव घटल्याने किमान तापमान स्थिरावले आहे. सकाळी व रात्री हलका गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेत तापमान वाढून हवामान उबदार राहणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत आजचा दिवस थंडीपेक्षा अधिक आरामदायक ठरणार आहे.

महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला !

आता थंडीची तीव्र लाट ओसरत असली, तरी पहाटे आणि रात्रीचा गारवा अद्यापही जाणवत आहे. 16 डिसेंबरसाठीचा हवामान अंदाज पाहता मंगळवारपासून पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असून दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र किमान तापमानाबाबत पुढील 2 दिवस फारसा बदल जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात सुमारे 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने घट होऊ शकते. त्यामुळे दिवसा ऊन थोडे जाणवले तरी सकाळी आणि रात्रीची थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील थंडीची लाट सध्या ओसरली असली, तरी उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. मागील 4 दिवस काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट स्पष्टपणे अनुभवायला मिळाली. आता तीव्रता कमी झाली असली, तरी बहुतांश भागात किमान तापमान 10 ते 12 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. आज राज्यातील सर्वात कमी तापमान जेऊर येथे 5.5 डिग्री सेल्सिअस इतके नोंदले गेले. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 7.1 डिग्री, तर अहिल्यानगर आणि मोहोळ येथे 8.3 डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews