Mon, Dec 29, 2025

Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल जाणवणार नाही. मात्र त्यानंतर किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे.
Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढणार; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

महाराष्ट्रात दिवसा हलका उकाडा जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे गार वाऱ्यांमुळे थंडी तीव्र होत आहे. उत्तर भारतात दाट धुके, कोल्ड वेव्ह आणि संभाव्य बर्फवृष्टीमुळे हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे एकुणच आगामी काही दिवसांत देखील राज्यातील थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल जाणवणार नाही. मात्र त्यानंतर किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे.

वर्षाच्या अखेरीस थंडीचा जोर वाढणार !

सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल जाणवणार नाही. मात्र त्यानंतर किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी हुडहुडी वाढेल. कमाल तापमानात थोडी वाढ दिसून आली तरी गारठा कायम राहणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागांमध्ये कोल्ड वेवचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र थेट या शीतलहरीच्या कक्षेत नसला तरी शेजारील राज्यांतील तापमानातील घसरणीचा परिणाम राज्यात जाणवणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून हिमालयीन भागात एक नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत आहे. याचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसांत अधिक तीव्र होणार असून 2 जानेवारीपर्यंत गारठ्याची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सध्या दाट धुक्याचे साम्राज्य पसरले असून पंजाबपासून बिहारपर्यंत अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. यामुळे रस्ते, रेल्वे आणि विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.