पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता. परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे. मात्र गेल्या अवघ्या आठवडाभराच्या काळात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तर मध्य भारतात हवेतील गारवा चांगलाच वाढतोय. राज्यात आता कडाक्याचा थंडीला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर सध्या वाढताना दिसत आहे.

गुरूवारी राज्यात कडाक्याची थंडी?

राज्यातील किमान तापमानात घसरण झाली आहे. यामुळे बहुतेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईतील किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. यामुळे गारवा जाणवण्यास सुरुवात झालीय. 13 नोव्हेंबर रोजी मुंबईत निरभ्र आकाश राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. पश्चिम महाराष्ट्रात देखील गारठा वाढला आहे. पुण्यातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूरमध्ये किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं असेल.

उत्तर महाराष्ट्रात कमालीचा गारवा जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस असेल. त्यामुळे इथे हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही किमान तापमान हे केवळ 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील मागील चार ते पाच दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. आगामी काळात देखील गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. छत्रपती संभाजीनगर शहरात 13 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर नांदेडमध्ये 14 अंश सेल्सिअस इतके असेल.

विदर्भात देखील सकाळी आणि संध्याकाळी गारवा कायम राहील. नागपूरमधील किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. एकंदरीत राज्यात सगळीकडेच गारठा वाढला आहे. आगामी दिवसांत गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान करण्याचा तसेच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यंदाची थंडी रेकॉर्ड ब्रेक ठरणार ?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना थंडीचा स्पर्श लवकरच जाणवणार आहे. यावर्षी मागील 25 वर्षांच्या तुलनेत थंडी थोडी जास्त भासणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जसा रेकॉर्डब्रेक ठरला अगदी त्याचप्रमाणे यंदाची थंडी देखील रेकॉर्ड ब्रेक ठरते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या अनेक भागात तापमान 15 ते 13 अंशांच्या घरात खाली घसरले आहे.